आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘व्हॅट’मुळे पेट्रोल-डिझेलचा भडका; पेट्रोल, डिझेल महागले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री कर वाढवल्याने शहरात पेट्रोल 61 पैशांनी, तर डिझेल 1 रुपया 9 पैशांनी महाग झाले आहे. आठ दिवसांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर थेट साडेसात रुपयांनी वाढवून महागाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या खिशाल भुर्दंड दिला होता. यात राज्य शासनाने पेट्रोलियम पदार्थांवरील विक्री कर वाढवून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. दरम्यान, औरंगाबाद पेट्रोलियम डीलर असोसिएशन संतप्त झाली असून कमिशन वाढवून देण्याच्या मागणीसाठी रविवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ते आणि शहर विकासकामांसाठी पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार वाढत असल्याचे कारण सरकारने पुढे केले आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नंदुरबार या पाच पालिका क्षेत्रांसाठीच पहिल्या टप्प्यात विक्री कर वाढवण्यात आला आहे. पेट्रोलवरील कर 25 टक्क्यांवरून 26 टक्के, तर डिझेलवरील कर 22 टक्क्यांहून 26 टक्के करण्यात आला आहे. या करवाढीच्या विरोधात पेट्रोल पंप संचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलची दरवाढ केली असली तरी पेट्रोल पंपधारकांचे कमिशन वाढलेले नाही. उलट पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल विकत घेण्यासाठी मोठी रक्कम गुंतवावी लागत आहे. औरंगाबाद पेट्रोलियम डीलर असोसिएशनची बैठक शुक्रवारी दुपारी झाली.
पेट्रोलियम कंपन्यांनी कमिशनची रक्कम न वाढवल्यास रविवारपासून संपावर जाण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे औरंगाबाद पेट्रोलियम डीलर असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले.