आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 पोलिस, 30 जणांचे पथक तरीही हटवले नाही पेट्रोलपंपाचे अतिक्रमण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रेल्वे स्टेशन लगतच्या उड्डाणपुलाजवळचा रस्ता रुंदीकरणात येणारा रुमी प्रिंटर यांच्या मालकीचा पेट्रोल पंप हटवण्यासाठी मनपाकडून कारवाईसाठी पथक जाते आणि रिकाम्या हाताने परत येते, असा प्रकार गेल्या २० वर्षात किमान चार वेळा घडला. सोमवारीही (१३ नोव्हेंबर) त्याचीच पुनरावृत्ती झाली. सकाळी साडेदहा वाजता मनपाचे अतिक्रमण हटाव पथक कारवाईसाठी गेले. त्यांच्यासोबत चार जेसीबी, दोन मालवाहू वाहने, एक अग्निशमन वाहन, त्यांचे कर्मचारी, मनपाचे एकूण ३० अधिकारी, कर्मचारी आणि ५० पोलिसांचा ताफा होता. तरीही सायंकाळी साडेसहा वाजता कार्यालयीन कामाची वेळ संपली असे म्हणत पथक परतले. त्यांच्यावर पंपालगतच्या हॉटेलचालकांसोबत असलेल्यांनी दगडफेकही केली. 

पोलिसांचे पूर्ण संरक्षण मिळाले नाही म्हणून कारवाई करता आली नाही, असे मनपाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. तर मनपाच्या अधिकाऱ््यांनीच पुढाकार घेतला नाही तर आम्ही काय करणार असा पोलिसांचा सवाल होता. दरम्यान, मोहीम फसल्यावर आम्ही पंप हटवण्यासाठी गेलोच नव्हतो, असा दावा रात्री साडेनऊ वाजेच्या मनपातर्फे करण्यात आला. उर्वरितपान.६ 

प्रकरण न्यायालयात असल्याचा दावा 
दगडफेकीनंतरएमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, विरोधीपक्ष नेता फेरोज खान, नासेर सिद्दीकी तेथे आले. त्यांनीही आधी पंपावर कारवाईची मागणी केली. तेव्हा गेल्या आठवड्यात आयुक्तांच्या आदेशाचे पालन करण्यास तयार असलेल्या अधिकाऱ्यांनी पंप प्रकरण न्यायालयात असल्याचा दावा केला. इम्तियाज यांनी पुरावा मागितला. तो दिला नाही. दरम्यान, प्रिंटर हे पत्नीवरील शस्त्रक्रियेसाठी ते मुंबईत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. 

ढकलाढकली...
‘पोलिसांनी मालमत्ताधारक त्यांच्यासोबतच्या लोकांना हटवण्यासाठी काहीच केले नाही. शिवाय पथक पोहोचल्यावर ट्राफिक जाम होत होता. त्याकडेही लक्ष दिले नाही. ते बघ्याच्या भूमिकेत असल्याने आम्हाला कारवाई करता आली नाही.’ 
- एम.बी. काझी, अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख

‘अतिक्रमण काढण्याची जबाबदारी मनपाची होती. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पू्र्ण बंदोबस्तासह उपस्थित होतो. पण त्यांनी कारवाईच केली नाही. मग पोलिस तरी काय करणार?’ 
- गोवर्धन कोळेकर, सहायक पोलिस आयुक्त
 

यापूर्वी १९९६, २००३, २००६, २०११मध्ये हा पंप हटवण्यासाठी मोहीमा आखण्यात आल्या होत्या. प्रत्येक वेळी नवनवीन कारणे सांगून पथक माघारी आले. 
 
जेसीबीच्या काचा फुटल्या
जमावानेदगडफेक सुरू केली. त्यात जेसीबीच्या काचांचा चुराडा झाला. बघे पळत सुटले. गोंधळ वाढत चालल्याने पथकाने कार्यवाही थांबविली. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यत एक इंचही अतिक्रमण काढण्यात आले नव्हते. 

अतिक्रमणांचे पडसाद आजच्या स्थायीसमोर 
रेल्वेस्टेशनपरिसरातील पेट्रोलपंपाचे अतिक्रमण हटवल्यास राजीनामा देणार, असा इशारा नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी दिला होता. या कारवाईसाठी त्यांनी दिलेली सात दिवसांची मुदत मंगळवारी संपत आहे. नेमकी तेव्हाच स्थायी समितीची बैठक असून या अतिक्रमणांचे पडसाद त्यात उमटणार हे नक्की आहे. सकाळी ११.३० वाजता या बैठकीला सुरुवात होईल. त्यामुळे या मुद्द्यावरून सभा गाजण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...