आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Pump Robbery Issue At Nashik Women's Gang Arrested

कॅशियरला लूटणारी महिलांची टोळी नाशकात जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक (पंचवटी)- सराईत गुन्हेगारांकडून लूटमारीचे प्रकार घडत असताना चार महिलांच्या टोळीने पेट्रोलपंप कामगाराला लुटल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. पोलिसांनी काही तासांतच महिलांची ही टोळी जेरबंद केली. यामध्ये पंपावरील कामगारानेच लुटीचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

पेठरोडवरील गुडअर्थ पेट्रोलपंपाचे कॅशिअर रवींद्र देशमुख आणि कामगार श्रीकांत सोनवणे हे दुचाकीने (एमएच 15 डीएच 0508) रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास रोकड घेऊन निघाले असता शरदचंद्र मार्केटजवळ चार महिलांनी आडवे होत मदतीची मागणी केली. दुचाकी थांबविताच देशमुख व सोनवणे यांना महिलांनी मारहाण करीत पैशांची बॅग हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या देशमुख यांनी पंचवटी पोलिसांना कळविताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांचा सोनवणे यांच्यावर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच त्यानेच महिलांच्या मदतीने लुटीची योजना आखल्याची कबुली दिली. त्यानुसार संशयित चांदणी संजय वावरे, जयवंता प्रकाश गांगुर्डे, लताबाई मधुकर कांबळे, रंजना राजेंद्र कोळगे यांना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली तपास करण्यात आला. संशयित महिलांकडून 10 हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली.

कामगारानेच रचला कट
संशयित कामगार श्रीकांत सोनवणेला गाडी थांबवू नको, असे सांगूनही त्याने गाडी थांबवली. चारही महिलांनी तोंडाला कपडे बांधले होते. सोनवणेने महिलांना इशारा करताच मारहाण करून लूटमार करण्यात आली. दोन सत्रातील पंपावरील जमा झालेली एकत्रित रोकड मालकाच्या घरी देण्यात येते त्याच वेळी लूट करण्याचा कट रचण्यात आला.