आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PF Deposits Amount Of Their On Account , Account Holder Refused To Pay

पीएफची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यावर जमा, खातेदाराचा पैसे देण्यास नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयुष्यभर रक्ताचे पाणी करून मुलांच्या तोंडात घास भरवणारी आई एके दिवशी भाजली. तिच्या मुलाने तीन वर्षे दिवसरात्र काबाडकष्ट करून पैसा जमवला. तिला चांगल्या दवाखान्यात दाखवण्यासाठी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर चुकून ती मित्राच्या खात्यात जमा झाली. आता त्याने पैसे देण्यास नकार दिला. पीएफ ऑफिस तसेच संबंधित कारखान्याने यात आपली चूक नसल्याचे सांगितल्याने आता तो त्या मित्राला विनवण्या करतोय.

पैठण तालुक्याच्या पाचोड येथील विश्वनाथ चव्हाण हा गावात किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र, व्यापारात जम बसल्याने तो कुटुंबासह तीन वर्षांपूर्वी गारखेड्यातील गुरुदत्तनगर येथे राहावयास आला. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने एका सुरक्षा एजन्सीमध्ये काम मिळवले. एके दिवशी गरम पाणी काढताना वृद्ध आई द्वारकाबाईंचा पदर पेटल्याने त्या भाजल्या. उपचार करूनही त्यांना आराम पडत नव्हता. आईचे दु:ख पाहून विश्वनाथने अधिकचा पैसा मिळावा म्हणून सुरक्षा रक्षक एजन्सीच्या सुपरवायझरकडे जादा काम मिळावे यासाठी तगादा लावला. अडचण लक्षात घेता एजन्सीच्या सुपरवायझरने विश्वनाथला ओव्हरटाइमची ड्यूटी देत मदत केली. चोवीस तास काम करीत विश्वनाथने आईच्या उपचारापुरती रक्कम जमवली. ऐनवेळी पैसा कमी पडू नये म्हणून त्याने नोकरीचा राजीनामा देत भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा झालेली रक्कमही काढण्यासाठी प्रयत्न केला. एजन्सीने त्याची अडचण लक्षात घेत त्याचा राजीनामा मंजूर करून खात्यावरील रक्कम त्वरित मिळावी यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून दिली. पैसे मिळत नसल्याने तो वारंवार पीएफ कार्यालयात चकरा घालत होता. काही दिवसांनंतर पीएफ खात्याच्या अधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्रव्यवहार केला तेव्हा सदर रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाल्याचे स्पष्ट झाले. बँक खात्याचे शेवटचे दोन क्रमांक चुकले अन् रक्कम शामराव निकम नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाली. ही रक्कम ४१ हजार एवढी होती. विशेष म्हणजे निकम हा त्यांच्या परिचयाचा आहे. त्यामुळे चव्हाण यांनी निकमला पैसे देण्याची विनंती केली, परंतु त्याने पैसे देण्यास नकार दिला. आता पोलिस चव्हाण यांची तक्रार घेत नाही. पीएफचे म्हणणे आहे, जो क्रमांक आम्हाला देण्यात आला त्यानुसार आम्ही त्या बँक खात्यावर पैसे जमा केले. सुरक्षा कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी फॉर्म भरून देताना जो क्रमांक दिला होता तो आम्ही तातडीने पीएफ कार्यालयाकडे पाठवला.

मला पैसे मिळावेत
आईच्या उपचारासाठी पीएफची पूर्ण रक्कम मिळावी म्हणून मी नोकरी सोडली. कंपनीनेही लगेच पीएफचा फॉर्म दिला. पैसेही वेळेत जमा झाले. पण दुसऱ्याच्या नावावर. त्याची नियत आता फिरली आहे. मला पैसे मिळावेत एवढीच इच्छा आहे. ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत. न्याय मिळावा एवढीच अपेक्षा. -शामराव चव्हाण, पीडित.