औरंगाबाद- पीएचडी झाल्यानंतरही गाइडशिप मिळण्यासाठी प्राध्यापकांना लागणारा विलंब आणि त्यानंतर पुन्हा नव्या संशोधक विद्यार्थ्यांना गाइड मिळत नसल्याने पीएचडी मार्गदर्शक होण्याच्या काही नियमांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने बुधवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी झालेल्या काही ठरावीक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यात पीएचडीसाठी मार्गदर्शक होण्यासाठी आतापर्यंत पाच ते सात वर्षांचा कालावधी पीएचडी झाल्यानंतर गृहीत धरला जात असे. तसेच पीएचडी बरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन पेपर प्रकािशत झालेले असावेत. संशोधन कामगिरीलाही महत्त्व देण्यात आले होते. त्यात आता शिथिलता देण्यात आली असून पीएचडी झालेले, नेट-सेट उत्तीर्ण तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्यांनादेखील त्यांच्या संशोधन कार्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या पेपरच्या आधारावर मार्गदर्शक म्हणून संधी मिळणार आहे, तर आता पीएचडीसाठी आवश्यक असलेली पूर्व परीक्षा पेट ही एकदाच द्यावी लागणार आहे, अशाही निर्णयास यात मंजुरी देण्यात आली आहे. याबरोबरच कान्हेरे समितीने नेमण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या संदर्भात एक रिपोर्ट सादर केला होता. त्यानुसार निवड झालेल्या प्राध्यापकांची नेमणूक नियमात नसेल तर कारवाई करावी असाही निर्णय घेण्यात आला.