आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pharmacists Samakanta Vasantrao Pakhal,Latest News In Divya Marathi

गरज नितांत; तरी मोहावर मात,रस्त्यात सापडलेली 40 हजारांची रोकड केली परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घरी गरिबीमुळे औषधोपचारही न घेऊ शकणारे आजारी वडील आणि स्वत:च्या शिक्षणासाठी पैशांची विवंचना असताना रामहरी कोल्हे नावाच्या तरुणाने रस्त्यावर सापडलेले 40 हजार रुपये पोलिसांच्या हवाली केले. अर्थात, त्याचवेळी त्या रकमेवर लक्ष गेलेल्या शामकांत पाखले यांचीही त्याला त्यासाठी साथ मिळाली. सिडको बसस्थानक ते कामगार चौक मार्गावर इंदू-दुर्गा अपार्टमेंटसमोर रस्त्यावर प्लास्टिकची पिशवी पडली होती. ती तिथून जात असलेल्या रामहरी कल्याणराव कोल्हे या तरुणाला दिसली. त्याचवेळी तिथून दुचाकीवर जाणा-या फार्मासिस्ट शामकांत वसंतराव पाखले (39) यांनाही ती पिशवी दिसल्यामुळे तेही ती उचलून पाहण्यासाठी थांबले. दोघांनी ती पिशवी उचलली आणि उघडून पाहिली तर त्यात 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्यांनी ती रक्कम मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जमा करण्याचा निर्णय घेतला.
द्वारकानगर एन-11 हडको येथील रहिवासी शामकांत हे सिडको एन-4 मध्ये फार्मोसिस्ट म्हणून काम करतात, तर चिकलठाणा येथील रहिवासी राम (18) हा एमआयटी महाविद्यालयात पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत आहे. त्या दोघांनी तत्काळ मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून पैसे जमा केले. दोघांचा प्रामाणिकपणा पाहून सहायक पोलिस आयुक्त गणेश राठोड, पोलिस निरीक्षक प्रेमराज चंद्रमोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राठोड यांनी सर्व नोटांची मोजणी केली असता 500 रुपयांच्या 80 नोटा म्हणजे 40 हजार रुपये आढळून आले. ज्याचे पैसे असतील त्यांनी योग्य पुरावा सादर करून ते घेऊन जावेत, असे आवाहन राठोड यांनी केले.
मजुरीवर चालतो चरितार्थ
रामहरी हा मूळ बदनापूरजवळील देवगाव कुसळी या गावाचा रहिवासी आहे. त्याचे वडील अनेक दिवसांपासून आजारी आहेत, तर आई सध्या चिकलठाण्यातील रेल्वेगेट शेजारी बहिणीच्या शेतात मजुरीचे काम करते. रामहरीसुद्धा मिळेल ते मजुरीचे काम करून शिक्षण घेत आहे. वडिलांच्या उपचारासाठी पैसे लागतात म्हणून अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार केलेले नाहीत. 40 हजार रुपये पाहून ते पैसे जवळ बाळगण्याचा विचार मनात आला नसल्याचे त्याने ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला सांगितले.