आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्टोबरअखेरीस होणार ‘पेट’ परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची दुसरी पीएचडी पूर्वपरीक्षा (पेट) ऑक्टोबरच्या अखेरीस घेण्याचा निर्णय झाला आहे. ही परीक्षा ऑनलाइन घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. प्रभारी कुलगुरू तथा महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. भागवत कटारे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या विद्याशाखांच्या अधिष्ठातांच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय झाला.
पीएचडी पूर्वपरीक्षा लागू झाल्यापासून विद्यापीठाने केवळ एकच पेट परीक्षा घेतली आहे. 2010 या सत्रामध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी हरकती घेतल्या होत्या. त्यामुळे संशोधन प्रक्रिया दोन वर्षांपासून रेंगाळली होती. मात्र, बीसीयूडी संचालक डॉ. कटारे यांनी रुजू होताच संशोधन प्रक्रियेला गती दिली असून संशोधन मान्यता समित्यांना कार्यान्वित केले. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत झाला आहे. परीक्षेचा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार असून लगेचच पीएच.डी. प्रवेशप्रक्रियेला गती दिली जाईल.
एमकेसीएलच्या मदतीने पेट परीक्षा ऑनलाइन घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, शक्य न झाल्यास संगणकाद्वारे तपासणीची सोय करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांना मंगळवारी बैठकीचे निर्णय कळवले जाणार असून त्यानंतरच अधिसूचना जारी केली जाणार आहे. या बैठकीला अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. उल्हास शिंदे, डॉ. शोभना जोशी, डॉ. विलास खंदारे, डॉ. एस. एस. शेख, डॉ. भारत हंडीबाग यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती.
समन्वय समितीही गठित
पेट परीक्षा निर्विवाद पार पडावी म्हणून प्रा. डॉ. राम माने यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय प्राध्यापकांची समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. माधव सोनटक्के यांच्यासह आठ जणांचा समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पेट परीक्षेसंदर्भातील यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी डॉ. माने समिती काम करणार आहे.