आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंतीआडच्या विषयावर बोलल्या ‘त्या’ दोघी जणी; शहरवासीयांनी दिला भरभरुन प्रतिसाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिलांप्रमाणे पुरुषांनाही मिशीखाली लिपस्टिक लावली तर त्यांचे हसू होते, पण यामुळे ते ट्रान्सजेंडर ठरत नाहीत. खांद्यावरून बाहेर येणारे अंतर्वस्त्र सावरताना महिलांची दमछाक होते, पण पुरुषांना याचा कधीच अडथळा वाटत नाही. या आणि अशाच चार भिंतीआड बोलल्या जाणाऱ्या बाबींना शहरातील दोन तरुणींनी वाचा फोडली. या विषयावर त्यांनी सर्वेक्षण केले. ‘जेंडर बेंडर औरंगाबाद’ या छायाचित्र प्रदर्शनातून हा विषय त्यांनी मांडला. 
 
औरंगाबाद आणि दिल्ली येथे शिकत असलेल्या स्वस्तिका जाजू आणि मीरा काळे या महाविद्यालयीन तरुणी लैंगिकतेविषयी सर्वसामान्यांच्या मनात होणारी घालमेल या विषयावर अभ्यास करत आहेत. त्यांनी सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे लैंगिकतेविषयीचे मत जाणून घेतले. शहरातील शाळा महाविद्यालयात फिरून नागरिकांच्या दोन मिनिटांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती घेताना उत्तरदात्यांचे चित्रीकरण केले, छायाचित्रे घेतली. सर्वेक्षणातील निष्कर्षांवर त्यांनी ४७ मिनिटांची ‘इक्वल’ ही शॉर्टफिल्म तयार केली आहे. रविवारी ‘क्रीम अँड क्रंच’मध्ये याचे प्रदर्शन केले. 
 
छायाचित्रांनी लक्ष वेधले : प्रदर्शनात१५० ते २०० छायाचित्रे मांडण्यात आली. यात लैंंगिकतेविषयी सुप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. लिपस्टिक अंडर माय मोस्टेक या चित्रात लिपस्टिक लावणाऱ्या पुरुषांच्या भावना दिसतात. त्यास लिपस्टिक लावावे वाटते, याचा अर्थ तो तृतीयपंथीयांच्या श्रेणीत मोडत नाही असे हे चित्र सांगते. मुलींनी चारचौघांसमोर कसे बसावे याचे त्यांना बालपणापासून नियम घालून दिलेले असतात. पुरुषांना मात्र कसेही बसलेले चालते. लिंगाचे स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर असे तीनच प्रकार आपल्याला माहिती आहेत. मात्र, असे ३३ प्रकार अस्तित्वात आहेत. आणखी खोलात गेलो तर असे ७५ प्रकार असल्याचे मीरा आणि स्वस्तिका यांनी सांगितले. या आणि अशाच अनेक बाबींना छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांनी मांडले. सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या नताशा झरीन, गौरी मिराशी आणि ग्राइंडमास्टरचे सीईओ समीर केळकर यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. अागळ्यावेगळ्या कार्यक्रमाला शहरवासीयांची गर्दी झाली होती. 
 
लैंगिकतेविषयी फार बोलल्या जाणाऱ्या विषयावरील कार्यक्रमाला शहरवासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला. याचा अर्थ या विषयाबाबत त्यांना आणखी जाणून घ्यायचे आहे. पण यासाठी नेमका कोणी पुढाकार घ्यायचा हे ठरत नाही. आम्ही हा पुढाकार घेतला. या विषयात आणखी काम करायचे आहे. लैंगिकतेविषयी असणारा पडदा दूर करायचा आहे.
- स्वस्तिका जाजू, मीरा काळे, आयोजक, जेंडर बेंडर, औरंगाबाद 
बातम्या आणखी आहेत...