आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पिकनिकसाठी पर्यटक जात आहेत दौलताबादचा व्ह्यू पॉइंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऐतिहासिक दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी, पर्यटक नियमित येतात. किल्ला पाहून झाल्यानंतर पुढे खुलताबाद व वेरूळ येथील पर्यटनस्थळे पाहण्याचा प्रत्येकाला मोह होतो. मात्र, त्यासाठी दौलताबाद घाट पार करावा लागतो. घाट संपण्यापूर्वी डोंगरदर्‍यात खोलवर पसरलेला मोमबत्ती तलाव लागतो.

तलाव पाहण्यास जाण्यापूर्वी महामार्गालगतचे फळांचे स्टॉल आपले स्वागत करतात. या ठिकाणी बाराही महिने हंगामानुसार विविध प्रकारची फळे मिळतात. परिसरातील शेतात पिकणारी ही फळे लज्जतदार असतात. सोबत भाजलेली मक्याची कणसेही येथे मिळतात. फळे किंवा मक्याची कणसे विकत घेऊन तुम्ही हिल स्टेशनपर्यंत जाऊ शकता. हिल स्टेशनवरून खाली खोल दरीत तलावाचे दर्शन घडते. दूरपर्यंत पसरलेले निळेशार पाणी, भोवताली उंचच उंच डोंगररांगा, अंगाला झोंबणारा गार वारा मन मोहून टाकतो. याच ठिकाणी आपण स्नेहभोजनाचा आनंदसुद्धा घेऊ शकता. मित्र किंवा मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी हा स्पॉट रोमँटिक ठरतो. तलावापर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता नसला तरी खाचखळगे पार करत पायथ्यापर्यंत जाता येते. तलावाच्या भिंतीवर बसून पाणी निरीक्षण करता येते. येथून काही अंतरावर हिरव्यागार वातावरणात काही हॉटेल्स आहेत. तेथे तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता.

तुम्ही पोहण्यात पटाईत असाल तरच तलावात उतरणे योग्य ठरेल. कारण हा तलाव प्राचीन असून यामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. केवळ पाणी व निसर्ग पाहून झाल्यानंतर पुढे परिसरातील वॉटर पार्क पाहता येतो.औरंगाबादहून 20 किलोमीटर

कसे जाल ?
औरंगाबादहून बसेस, खासगी वाहने किंवा स्वत:च्या दुचाकीने नाही तर चारचाकी वाहनातून जाता येते.

काय पाहाल ?
दौलताबाद किल्ला. घाटाला सुरुवात होताच पहिल्या वळणावर थांबून पुन्हा भव्य दिव्य घाटांचा नजारा पाहता येतो. पुढे एक किलोमीटर अंतर पार केल्यानंतर घाट संपतो. त्याच ठिकाणी मोमबत्ती तलाव आहे. तलाव पाहिल्यानंतर शेजारी असलेल्या रिसॉर्टमध्ये भोजनाचा आनंद घेता येतो किंवा हिल स्टेशनवर थांबून फळे खाऊन पोटपूजा करता येते.