आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक पर्यटक नोंदणीचे धोरण हवे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केदारनाथ यात्रेसाठी गेलेले मराठवाड्यातील 111 भाविक बेपत्ता असल्याची माहिती बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे. तथापि, यात्रेवर जाताना औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील भाविकांची कुठेच नोंदणी नसल्याने नेमके किती जण गेले आणि किती अडकले याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे उत्तराखंडातील महाप्रलयापासून धडा घेऊन शासन-प्रशासनाने धार्मिक पर्यटकांच्या नोंदणीचे धोरण निश्चित करावे, असा नवा विचार आता पुढे येत आहे.

अमरनाथ व कैलास मानसरोवर यात्रेप्रमाणेच केदारनाथ यात्रेकरूंची प्रशासनाकडे नोंद असती, तर आपत्ती व्यवस्थापनातील मोठय़ा अडचणी दूर झाल्या असत्या. केवळ ट्रॅव्हल्स एजंट कंपन्याच यात्रेकरूंच्या ग्रुपची नोंदणी करतात. स्वत:च्या गाड्या करून जाणार्‍या यात्रेकरूंची कुठेच नोंदणी होत नसल्याने जिल्ह्यातून अथवा शहरातून किती यात्रेकरू केदारनाथ यात्रेला गेले यासंबंधीचा नेमका आकडा कळायला मार्ग नाही.

फक्त गटप्रमुखाची होते नोंदणी : अक्षयतृतीयेला सुरू होणारी केदारनाथची यात्रा दसरा दिवळीपर्यंत सुरू असते. हिमवृष्टी होत असल्याने केदारनाथचे दरवाजे सहा महिने बंद असतात. किती भाविकांना प्रवेश देण्यात यावा यासंबंधीचेही धोरण प्रशासनाने निश्चित केलेले नाही. जिल्हा प्रशासनाकडेही केदारनाथ यात्रेला जाणार्‍या पर्यटकांची नोंद केली जात नाही. ट्रॅव्हल्स कंपनीमार्फतही एकाच प्रमुख व्यक्तीची ग्रुप म्हणून सविस्तर नोंदणी ट्रॅव्हल एजन्सी करते, मात्र प्रत्येक यात्रेकरूची नोंद होत नाही. शिवाय स्वत:च्या गाड्या घेऊन जाणार्‍या कुटुंबांची अथवा ग्रुपची नोंदणी स्थानिक प्रशासनाकडे केली जात नसल्याने आपत्तीनंतर पर्यटक शोधताना कुटुंबीयांसह प्रशासनाचीही दमछाक होते.

नोंदणी नव्हे, संख्येवरही र्मयादा हवी
भाविकांची नोंदणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणे आवश्यक असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी म्हटले. केदारनाथ येथे जिल्हा, विभाग किंवा राज्यातील किती भाविक अडकले आहेत, हे अजूनही छातीठोकपणे सांगता येत नाही. विभागातून केदारनाथ येथे गेलेल्यांपैकी 111 भाविक संपर्काबाहेर आहेत. पूर्वी हा आकडा 25 इतका होता. मात्र, भाविकांच्या नातेवाइकांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि संख्या वाढत गेली. नेमके किती भाविक तेथे गेले आहेत, याचा कोणताही आकडा प्रशासनाकडे नव्हता.

स्थानिक प्रशासनाने नोंदणी करावी
केवळ ट्रॅव्हल्स एजंटकडेच केदारनाथ यात्रेकरूंची नोंदणी असते. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक धार्मिक पर्यटनाची नोंदणी केल्यास आपत्ती व्यवस्थापनात मदत मिळेल. स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी असती तर जिल्ह्यातील नेमके किती पर्यटक अडकले याची माहिती मिळाली असती. मंगेश कपोले, हेरंब ट्रॅव्हल्स, औरंगाबाद.

धोरणात्मक निर्णयाची गरज
एखाद्या ठिकाणी किती भाविक किंवा पर्यटक असावेत हे आधीच ठरवावे. मुख्य सचिवांशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही मी ही सूचना केली. अमरनाथ, कैलास मानससरोवर तसेच हज यात्रेसाठी जसे नियोजन होते तसे प्रत्येक ठिकाणी व्हावे. यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. अपघात टाळणे आपल्या हाती नसले तरी गर्दी नसल्याने हानी कमी केली जाऊ शकते. - संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त.