आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबी बोंडअळीमुळे 1735 कोटींचे नुकसान; कापूस उत्पादकांना बसला फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कीड, रोग व गुलाबी, शेेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी उत्पादनात १०% नुकसान झाल्याची अधिकृत आकडेवारी कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याकडे पाहता राज्यातील शेतकऱ्यांचे हे एकूण आर्थिक नुकसान अंदाजे १,७३५ कोेटींच्या घरात असल्याचे स्पष्ट होत आहे.

हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशी बीटीसोबत नॉन बीटी कपाशीची लागवड आवश्यक असते. संरक्षण सापळा म्हणून नॉन बीटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, एकाही शेतकऱ्याने त्याची लागवड केली नाही. परिणामी गुलाबी अळीने कपाशीचे १०% नुकसान झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या ६१ व्या बैठकीत सांगितले होते. या आधारे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत नुकसानीचा आकडा समोर येत आहे.
 
अधिकाऱ्यांनुसार ४ कोटी ३ लाख ६० हजार ४० क्विंटल कापूस उत्पादनांपैकी ४० लाख ३६ हजार ०४ क्विंटल उत्पादनात घट आली. म्हणजेच प्रतिक्विंटल ४३०० रुपये दराने राज्यात सुमारे १७३५ कोटी तर मराठवाड्यात सुमारे ६६६.१८ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बीटीचे तंत्र वापरण्यात कुचराई : २००२ मध्ये बीटी तंत्रज्ञानामुळे कापूस उत्पादनात क्रांती झाली. कपाशीच्या संरक्षणासाठी ४५० ग्रॅम कपाशी पाकिटात १२० ग्राम नॉन बीटी (रेफ्यूज) चे पाकीट लागवडीसाठी देणे अनिवार्य आहे. ते टाकणे पाकिटात सक्तीचे बियाणे कंपनीला आहे. त्याची लागवड केल्यास बीटी कपाशीचे कनड, रोग, अळीपासून संरक्षण होते. मात्र, कंपन्या बीटीसोबत नॉन बीटी बियाणे देत नाहीत. अशा १७ कंपन्यांवर गतवर्षी कारवाई झाली होती. परभणी जिल्ह्यात अशी २ लाखांवर पाकिटे जप्त करण्यात आली होती.

जमीन पडिक राहते म्हणून
नॉन बीटीच्या लागवडमुळे २०% शेत पडिक राहते म्हणून कंपन्यांनी बियाणे दिले तरी ते लावत नाहीत. परिणामी शेंदरी, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. यंदा असे सरासरी १०% नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
 
कपाशीचे असे झाले नुकसान
१०% उत्पादन घटल्याने ४० लाख ३६ हजार ०४ क्विंटलची घट होईल. ४,३२० रुपये प्रतिक्विंटल हमी भावाच्या हिशेबाने एकूण १,७३५ कोटींचा फटका बसेल. मराठवाड्यात १५ लाख ९२,२४३ हेक्टर कपाशीचे क्षेत्र आहे. हेक्टरी ९७३ किलोच्या हिशेबाने १ कोटी ५४ लाख ९२ हजार ५२४ क्विंटल उत्पादन आहे. एकूण उत्पादनात १०% घटीप्रमाणे विभागात १५ लाख ४९,२५२ क्विंटलची घट झाली. म्हणजेच एकूण ६६६.१८ कोटींचे नुकसान झाले. 
 
 
काळजी आवश्यक
लागवडीपूर्वीची काळजी, नंतरच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती अभियान राबवले.  तरीही शेतकऱ्यांनी नॉन बीटीची लागवड केली नाही. यामुळे १०% नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. 
- डॉ. एस. बी. पवार, संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
 
राज्यात कपाशी उत्पादन
- महाराष्ट्रातील सरासरी उत्पादकता : प्रतिहेक्टर ३२१ किलो रुई, ९३७ क्विंटल कापूस
- पेरणी क्षेत्र चालू वर्षी : ४१ लाख ४९ हजार १९४ हेक्टर
- सरासरी उत्पन्न : ४ कोटी ३ लाख ६० हजार ४० क्विंटल
बातम्या आणखी आहेत...