आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंदी पावणेदोन महिन्यात उठवली; धोकादायक औषध पुन्हा मधुमेहींच्या माथी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मधुमेहींना पायोग्लिटॅझोन औषध दिल्याने मूत्राशयाचा कर्करोग, हार्ट फेल्युअर आणि अन्य आजार बळावत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली. मात्र अलीकडेच ही बंदी उठवल्याची अधिसूचना (31 जुलै) काढण्यात आली. एकदा बंदी घातलेले औषध पुन्हा विकण्याची परवानगी देण्यात आल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. औषध कंपन्यांच्या लॉबीमुळे सरकारने त्यावरील बंदी हटवल्याची शंका अनेक डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
टकेडा फार्मा या जपानी कंपनीने सुमारे दहा वर्षांपूर्वी मधुमेहावरील प्रभावी आणि स्वस्त औषध म्हणून पायोग्लिटॅझोनला बाजारात आणले. या औषधाची देशातील वार्षिक उलाढाल 700 ते 800 कोटी रुपयांची आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 15 ते 20 हजार मधुमेहींपैकी बहुसंख्य रुग्णांना दरमहा 15 ते 20 लाख रुपयांचे औषध विकले जाते. पायोग्लिटॅझोन आणि त्याच्यासह इतर औषधांच्या ‘कॉम्बिनेशन’चे कमीत कमी 7.5 आणि जास्तीत जास्त 15 मिग्रॅचे डोस रुग्णांना दिले जात होते. मात्र, मूत्राशयाचा कर्करोग, हार्ट फेल्युअर होत असल्याचे जगभर सिद्ध झाल्याने तांत्रिक सल्लागार औषध मंडळाने बंदीची शिफारस करताच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 जून 2013 रोजी पायोग्लिटॅझोनवरील बंदीची अधिसूचना जारी केली. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली. एखाद्या औषधावर बंदी घालताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. याबाबत शहरातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. दीपक भोसले म्हणाले, ‘राष्टÑीय फार्मा को-व्हिजिलन्स या कार्यक्रमांतर्गत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधून पायोग्लिटॅझोनबाबतची मते जाणून घ्यायला हवी होती.
या प्रक्रियेस एक-दोन वर्षे लागतात. परंतु हे आवश्यक होते. कायदेशीरपणे बंदी नसल्यानेच सरकारला माघार घ्यावी लागली. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने जून 2011 मध्ये ‘औषध सुरक्षा संवाद’ या उपक्रमातंर्गत प्रकाशित केलेल्या अहवालात पायोग्लिटॅझोनचे सेवन केल्याने वर्षभरात मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका 40 टक्के असतो असे नमूद केले होते. जगभर औषध विकणार्‍या टकेडा फार्मानेसुद्धा हा निष्कर्ष मान्य केला आहे. एकूण रुग्णांपैकी किती जणांना पायोग्लिटॅझोनमुळे मूत्राशयाचा कर्करोग झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

विदेशात दुष्परिणाम अधिक :
या औषधापासून कर्करोग होण्याचे प्रमाण विदेशात जास्त असले तरी भारतात ते कमी आहे. याचा डोस साडेसहा-साडेसात मिग्रॅ एवढाच दिल्यास रुग्णांना फायदा होतो. यामुळे इन्सुलिन सेन्सिटायझर संतुलित असतो. मधुमेहावरील इतर औषधांच्या तुलनेत हे औषध स्वस्त असल्याचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. एस. ए. इंदूरकर, यांनी सांगितले.

डॉक्टरांनी औषधाचे प्रमाण पाळावे
क्लिनिकल रिसर्चच्या नावाखाली विदेशी कंपन्यांकडे भारतातील रुग्णांचा डाटा पाठवला जात होता. त्याच आधारे निष्कर्ष काढले गेले आणि या औषधावर बंदीचा निर्णय घेतला गेला असावा. अँलोपॅथीच्या अन्य ड्रग्जचेही साइडइफेक्ट होतात. मात्र, योग्य प्रमाणातच औषधाचा वापर करण्याची आवश्यकता असून डॉक्टरांनी ते पाळावे, असे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक शेरकर यांनी केले आहे.

पायोग्लिटॅझोनच का ?
मधुमेहावरील इतर औषधांच्या तुलनेत हे औषध अधिक कार्यक्षम आहे. ते ब्लड आणि शुगर लवकर नियंत्रणात आणते. इतर औषधांच्या तुलनेत हे 10 टक्के स्वस्त आहे. त्यामुळे पायाग्लिटॅझोन वापरण्यास डॉक्टर प्राधान्य देतात.
-डॉ. वर्षा आपटे, मधुमेहतज्ज्ञ.

जुना स्टॉक कंपन्यांना परत
औषधाच्या विक्रीला परवानगी दिल्याने देशभरातील विक्रेत्यांकडील पायोग्लिटॅझोनचा जुना स्टॉक कंपन्यांकडे परत पाठवला. नवा स्टॉक बाजारात येण्यास 15 दिवस लागतील.
-विजय नांदापूरकर, उपाध्यक्ष, स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, औरंगाबाद

बंदी येताच औषध परत
बंदीची अधिसूचना येताच संघटनेच्या वतीने एसएमएस आणि फोनद्वारे आमच्या सदस्यांना तातडीने कळवले. औषधाचा स्टॉक परत करण्याच्या सूचना केल्या. सुमारे 25 लाख रुपयांचा स्टॉक आम्ही कंपन्यांना परत केला आहे.
-दिलीप जैन, सचिव, औरंगाबाद केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

मेटफॉर्मिन सरस आणि स्वस्त !
एखाद्या औषधावर एकदा बंदी घातली असेल तर ते पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केले जात नाही.हे औषध पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध व्हायला नको होते आणि झाले तर फक्त 7.5 मिग्रॅ द्यावे. यास पर्याय म्हणून सरस आणि स्वस्त मेटफॉर्मिनचा वापर करावा.
- डॉ. दीपक भोसले, मधुमेहतज्ज्ञ.