आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्काळजीमुळे दुकानांत शिरले जलवाहिनीचे पाणी; जलवाहिनीचे काम सुरू असताना पाणीपुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याच रस्त्याच्या बाजूला 300 मि.मी. व्यासाची जीर्ण झालेली जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू असताना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक पाणीपुरवठा सुरू झाला. तीन तास सुरू असलेल्या या पाणीपुरवठ्यामुळे येथील सिद्धार्थ आर्केडमधील दुकान नंबर 9 ते दुकान नंबर 17 मध्ये पाणी शिरले. त्यामुळे या व्यापार्‍यांचे 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याच्या कामादरम्यान भूमिगत जलवाहिनी, ड्रेनेजलाइन बदलण्याचे कामही सुरू आहे. गोल्डी टॉकीजलगत असलेल्या सिद्धार्थ आर्केड आणि लाभ चेंबर्ससमोर पाणीपुरवठा आणि ड्रेनेजलाइन बदलण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या आहेत. काम सुरू असल्यामुळे येथील जलवाहिनी उघडी ठेवण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी पहाटे 300 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून मनपा पाणीपुरवठा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाणी सोडण्यात आले. यामुळे खोदलेल्या नाल्या तुडुंब भरल्या. त्यानंतर संपूर्ण पाणी सिद्धार्थ आर्केडमधील तळमजल्यातील दुकानांमध्ये शिरले.

मनपा अधिकार्‍यांची पाठ
सकाळीच दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकांना झालेला प्रकार लक्षात आला. त्यामुळे कोणी बादल्यांनी, तर कोणी मोटारी लावून पाण्याचा उपसा केला. चार ते पाच तास पाणी बाहेर काढण्यासाठी दुकानमालकांना प्रयत्न करावे लागले. मात्र, त्या वेळेत मनपाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही.
लाखो रुपयांचे झाले नुकसान
तळमजल्यातील मधुर मिलन मिठाई, वंडर ट्रॅव्हल्स, वसीम बेग अँड असोसिएट, पब्लिश अँड पब्लिश शॉप, भंडारी इंटरप्रायजेस, लव्हली ज्यूस सेंटर अशा गाळे क्रमांक 9 ते 17 या दुकानांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी भरले. यात दुकानातील फर्निचर, संगणक, बिल बुक, कागदपत्रे, एसी, झेरॉक्स मशीन, इन्व्हर्टर आदी सामानांचे लाखोंचे नुकसान झाले.
आयुक्तांना निवेदन
यातील व्यापार्‍यांनी नुकसान भरपाईसाठी मनपा आयुक्तांकडे मागणी केली आहे. यात नसिरोद्दीन सिद्दिकी, ललित भंडारी, मन्नान खान, ओमन खान, डॉ. सय्यद इक्बाल, वसीम बेग, सय्यद हुसेनी, दुंगरसिंग यांचा समावेश आहे. भरपाई मिळाली नाही, तर न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही या व्यापार्‍यांनी दिला.

जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे दुकानातील फर्निचर खराब झाले. अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
दुंगरसिंग राजपुरोहित, मधुर मिलन मिठाई

माझ्या दुकानामधील झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर जळाले. फर्निचर पाण्यात बुडाले. तब्बल एक लाखाचे नुकसान झाले आहे.
आमिर हुसेनी, वंडर ट्रॅव्हल्स अँड इंटरनेट
उपअभियंत्यांची जबाबदारी
४फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. याबाबत जबाबदारी स्थानिक उपअभियंता ख्वाजा यांच्याकडे आहे.
हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

हा तांत्रिक अपघात

४काल रात्री काम केले. जलवाहिनीचे जोड व्यवस्थित बसले नाहीत. पाण्याचा दाब वाढल्याने ती फुटली. हा तांत्रिक अपघात असल्याने यात नुकसान भरपाई देता येणार नाही.
आय. बी. ख्वाजा, उपअभियंता