आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलै महिना संपला तरी पाइपलाइनचे काम नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- "समांतर' चेकंत्राट देण्यात आलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडून जुलैअखेरीस जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या मुख्य पाइपलाइनचे काम सुरू करण्यात येणार होते. मात्र जुलै संपला असून खरेदी केल्या जाणाऱ्या पाइपची तपासणीच झाली नसल्याने कंपनीचा दावा फोल ठरला. कंपनी योजनेच्या भवितव्याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांकडूनही शंका व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे कंपनीचे अधिकारी मात्र जायकवाडी परिसरात सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत आहेत.

पालकमंत्री रामदास कदम, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांच्याकडून कंपनीला डेडलाइन देण्यात आली. त्यानंतर सर्वसाधारण सभा आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी १५ दिवसांत मुख्य पाइपलाइनचे काम करण्याचे आदेश दिले. तेव्हा कंपनीने जुलैअखेरीस काम सुरू होणार असल्याचा दावा केला होता. मुख्य पाइपलाइनबरोबर जायकवाडी जलाशयात पाणी उपसा करण्यासाठी जास्त क्षमतेचे नवीन पंपहाऊस तयार करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार होता. मात्र ही दोन्ही कामे अद्यापही सुरू करण्यात आलेली नाहीत. तसेच हे काम कधी सुरू करण्यात येईल, याबाबतही कंपनीच्या अधिकाऱ्यांना निश्चित अशी माहिती देता आली नाही. त्यामुळे या योजना कंपनीबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

पाइपची तपासणीच नाही : मुख्य पाइपलाइन टाकण्यासाठी दोन हजार मिमीचे माइल स्टील पाइप खरेदी करण्यात येणार आहेत. खरेदीपूर्वी या पाइपची तपासणी समांतर मनपाच्या वतीने नेमण्यात आलेल्या स्वतंत्र सल्लागार समितीकडून करण्यात येणार आहे. यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी सल्लागार समितीच्या अधिकाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु समांतर जलवाहिनीच्या अधिकाऱ्यांकडून संबंधितांचा मोबाइल क्रमांक मिळू शकला नाही.

तपासणीनंतर पाइपची खरेदी
जायकवाडीतील काम सुरू करण्यासाठी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन पाइप खरेदीपूर्वी सल्लागार समितीकडून तपासणी केली जाणार आहे. अद्याप तपासणी झाली नाही. अर्णब घोष, प्रकल्प संचालक

दोन वर्षांत पाणी मिळण्यावर प्रश्नचिन्ह
या योजनेला आता प्रारंभ झाल्यास दोन वर्षांत पाणी मिळण्याची काही प्रमाणात आशा होती. मात्र, अद्यापही सर्वेक्षण आणि तपासणीच्या कामालाच प्रारंभ झाला नाही. त्यामुळे दोन वर्षांत पाणी मिळेल किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.