आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत शहरातील दहा ‘उत्कृष्ट’ खड्डे, खड्डे सोडेनात शहरवासीयांची ‘पाठ’.

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निकृष्ट काम अन् सदोष तांत्रिक पद्धत यामुळे दरवर्षी जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जाते. वाहन चालवायचे म्हणजे उरात धडकीच भरते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हा प्रश्न पडतो. मनपाप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. या विभागाचे शहर हद्दीत काही रस्ते आहेत. त्यावर एवढे खड्डे आहेत की कोणता मोठा आणि जास्त धोकादायक याचा उलगडा करणे भल्याभल्यांना जमणार नाही. हीच अवस्था शहरभर आहे.
जिथे तिथे खड्डे
मुख्य असो की अंतर्गत.. कुठल्याही रस्त्यावर खड्डे तुमची ‘पाठ’ सोडणार नाहीत. त्यात पावसाळ्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांबरोबरच उखडलेली खडी आणि धूळ चारली जात आहे. धूळ खडीमुळे चुकून वाहन स्लीप झालेच तर थेट ‘खड्ड्यात’ जाण्याची व्यवस्था सारेच रस्ते करतील यात तिळमात्र शंका नाही. ‘कथा कुणाची अन् व्यथा कुणाला..’ अशी ही स्थिती. म्हणजेच खाबुगिरी यांची आणि त्रास प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या जनतेला असा हा प्रकार.
पावसाळ्यात रस्त्यांविषयीची ओरड होतेच. त्यानंतर कंत्राट निघतात. तेही निकृष्ट काम होते. पुन्हा तीच स्थिती होते. मुरुमाऐवजी माती टाकून पैसे उकळणे हा काहींचा धंदा आहे. दुसरीकडे आहे ते खड्डे असह्य झालेत. त्यामुळे व्यक्ती, संस्था-संघटना, सामाजिक संस्था वा अन्य नागरिकांनी विटा, मुरूम सिमेंट टाकून खड्डे तात्पुरते बुजवत दुरुस्ती करण्यासाठी पुढे यावे. त्याचे फोटोही आम्हाला पाठवावेत. सामाजिक संस्थेचे नाव, त्यांनी दुरुस्त केलेला रस्ता त्याचा परिसर याची माहिती आम्हाला dbstar@dbcorp.in वर ई-मेल करू शकता.
तात्पुरती दुरुस्ती करा, आम्हाला फोटो पाठवा
पावसाळा सुरू होण्याआधीपासूनच खराब रस्ते आणि जीवघेण्या खड्ड्यांवर डीबी स्टारने वारंवार कोरडे ओढले. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते केले जातात, पण खाबुगिरी अन् निकृष्ट कामामुळे त्यांची वाताहत होते. मग सुरू होते मलमपट्टी. डांबरीकरण करून केलेली ही थातूरमातूर मलमपट्टीही पुन्हा रस्त्यांच्या ‘जखमा’ उघड करते. म्हणजेच पुन्हा खड्डे. डीबी स्टार चमूने शहरभर फिरून दहा ‘उत्कृष्ट’ खड्डे निवडले. यापेक्षाही ‘चांगले’ खड्डे असू शकतात. यातून तुम्ही सर्वोत्कृष्ट निवडू शकता. याशिवाय ‘चांगला’ खड्डा माहिती असल्यास फोटो पाठवू शकता. शिवाय ही उत्कृष्टता शहराला शोभणारी आणि शहरवासीयांना मानवणारी नसल्याने आपण पुढाकार घेऊन तात्पुरती डागडुजी करू शकता.
सूचना केल्या आहेत
खडीमुरूमा साठी वॉर्डनिहाय अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवाच्या आत खड्डे बुजवले जातील. ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त,मनपा

या भागातही आहेत खड्डे
शहानूर मिया ते सूतगिरणी चौक रोड, सिडको एन-६ ते मथुरानगर, हडको एन-९ ते टीव्ही सेंटर रोड, गुलमंडी परिसर, रोशन गेट ते निजामगंज रोड, महावीर चौक ते मध्यवर्ती बसस्थानक, भडकल गेट ते मनपा रोड, गजानन महाराज मंदिर ते जवाहरनगर पोलिस स्टेशन.

फोटो पाठवा
आम्ही निवडलेल्या ‘उत्कृष्ट’ खड्ड्यापेक्षाही तुम्हाला आणखी जास्त ‘चांगला’ मोठा खड्डा माहिती असेल तर आम्हाला dbstar@dbcorp.in यावर ई-मेल करू शकता. हा फोटो पाठवताना भागाचा पत्ता, ज्या रस्त्यावर खड्डा आहे त्याचे नाव आणि फोटो पाठवणाऱ्याच्या नावाचा उल्लेख करावा.

पाण्याचा निचरा आवश्यक
पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी शहरात मुख्य रस्त्यांवर कुठेही सुविधा नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना हे काम करू दिले नाही. पावसाच्या पाण्याने रस्ते खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. अ.बा. सूर्यवंशी, अधीक्षकअभियंता, सा.बां. विभाग तात्पुरती दुरुस्ती करा, आम्हाला फोटो पाठवा
बातम्या आणखी आहेत...