आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दह्याचे ताक करण्यासाठी रस्त्यावर फेरफटका मारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तुम्हाला दह्याचे ताक करायचे असेल तर त्यासाठी स्वयंपाकघरात काही करण्याची गरज नाही. दह्याचे भांडे घेऊन चारचाकी, दुचाकीवर बसा आणि शहरात एक फेरफटका मारा. खड्ड्यांमुळे दह्याचे ताक होऊन जाईल, असा उपाय प्रख्यात लेखक रा. रं. बोराडे यांनी सुचवला आहे. अनेक वर्षांपासून खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत असल्याने संतप्त झालेल्या औरंगाबादकरांची भावना त्यांनी उपरोधिकपणे सोशल मीडियावर मांडली आहे.
पावसाने पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी मनपाचे पदाधिकारी, अधिकारी नवा वाद निर्माण करत आहेत. ‘दिव्य मराठी’ने सप्टेंबरच्या अंकात औरंगाबादचे नामाभिधान ‘खड्ड्यांचे शहर’ असे केले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मनपावर कठोर टीका केली. संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेले बोराडे यांनीही लोकभावना त्यांच्या खास, तिरकस शैलीत फेसबुकवर मांडली आहे. त्यांच्या पोस्टवर असंख्य नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. प्रेमानंद शिंदे म्हणतात : वर तरंगणारे लोणी काढून तापलेल्या डोक्यावर ठेवा. त्याचे तूप होईल. त्या तुपात थोडेेसे सैंधव मीठ घालून अंगभर चोळा. म्हणजे सांधेदुखी जाईल. रा. न. चाटे यांनी तर निघालेले लोणी मनपाला द्या, असा सल्ला दिला आहे. पंडित देशमुख यांनी बोराडेंची रेसिपी म्हणजे आधुनिक डेझर्ट असल्याचे म्हटले आहे. सचिन वसंत पाटील यांनी लोणी आलेच तर ते एखादा चोर, बोका खाऊन जाईल, अशी प्रतिक्रिया नोंदवली असून राजेंद्र भोसले यांनी लोणी काढूच नका, असा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, नगरसेवक पाठलाग करतील. कारण त्यांना कोणत्याही कामात लोणी खाण्याची सवय लागली आहे.
खड्डे नव्हे, निकृष्ट रस्ते हीच समस्या : बकोरिया
आम्ही खड्ड्यांमुळे त्रस्त आहोत, असे औरंगाबादकर म्हणत असले तरी प्रत्यक्षात खड्डे नव्हे, तर रस्ते हीच येथील मोठी समस्या असल्याचे मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले. ‘दिव्य मराठी’ शी बोलताना ते म्हणाले, येथे रस्त्यांची कामेच योग्य पद्धतीने झालेली नाहीत. अनेक भागांत रस्तेच नाहीत. पॅचवर्क केल्याने तात्पुरते समाधान यापलीकडे काहीही घडू शकणार नाही.

सहा सप्टेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी खड्ड्यांविषयी रोष व्यक्त केला. यासंदर्भात बकोरिया म्हणाले, त्यांचे म्हणणे रास्त आहे. लोकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही पॅचवर्कचे काम सुरू करत आहोत. काही वॉर्डांतील या कामांच्या निविदांना प्रतिसादच मिळालेला नाही. मात्र, केवळ खड्डे बुजवून लोकांना कायमस्वरूपी दिलासा मिळूच शकत नाही. त्यासाठी पूर्ण रस्ताच चांगला तयार करण्याचा एकमेव उपाय आहे. परंतु १३०० किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यासाठी १३०० कोटी रुपये लागतील. एवढी रक्कम मनपाच्या तिजोरीत नाही. म्हणून आम्ही राज्य शासनाकडे दीडशे कोटी रुपयांची मागणी केली आहे. ती मिळाली तर काही प्रमाणात रस्ते चांगले होतील. मनपाकडे पैसे का नाहीत? असे विचारले असता आयुक्त म्हणाले, मालमत्ता, पाणीपट्टी आणि नगररचनातून जेमतेम ३०० कोटी रुपये उभे राहू शकतात. पण आपण अर्थसंकल्प सुमारे ११०० कोटी रुपयांचा केला आहे. एवढी कामे होऊच शकत नाहीत. लोकांची दुसरी तक्रार पाणीपुरवठ्याविषयी आहे. गेल्या काही महिन्यांपासून समांतरचा ठेकेदार असलेली औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी कामच करत नाही. महापालिकेची पर्यायी यंत्रणा प्रभावीपणे काम करण्यास वेळ लागणार आहे, असेही ते म्हणाले.

{दह्याचे ताक करण्याचा साधा, सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात दही भरा. तीनचाकी, चारचाकी वाहनात बसा.
{औरंगाबादच्या रस्त्यांवरून फेरफटका मारा.
{खड्ड्यांमुळे वाहन हिंदकळत राहील. त्यामुळे दह्याची घुसळण होऊन ताक तयार होईल.

अशा विरोधाची सवय आहे
सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी तुम्हाला तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे तुम्ही पदाधिकाऱ्यांसोबत एखादी बैठक घेऊन तडजोड करणार किंवा त्यांचे म्हणणे समजावून घेणार आहात का, असे विचारले असता बकोरिया म्हणाले, प्रस्ताव आणण्याचा पदाधिकाऱ्यांना अधिकार आहेच. मलाही अशा विरोधाची सवय आहे. मी इथे आहे तोपर्यंत जनतेच्या हिताची कामे करतच राहणार.
बातम्या आणखी आहेत...