आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधी खर्चूनही रस्ते खड्ड्यात का गेले, खंडपीठाची महापालिका प्रशासनाला विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ते खड्ड्यात का गेले, अशा शब्दांत न्यायालयाने मनपाला विचारणा केली. वेळोवेळी निर्देश दिल्यानंतरही शहरातील रस्ते सुधारण्यासाठी मनपा तत्परता दाखवत जात नाही, असा शेराही नोंदवला. तसेच हॉटमिक्स प्लँट, मोंढा नाका उड्डाणपुलाखालील रस्ते, नागरिकांच्या तक्रारीसाठी वेबसाइट सुरू नसणे आणि वाहतूक सल्लागार समितीच्या कामावर नाराजी व्यक्त करत १० ऑगस्ट रोजी मनपा आयुक्तांनी व्यक्तिश: हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी दिले.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत पार्टी इन पर्सन अॅड. रूपेश जैस्वाल यांनी २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात खंडपीठाने वेळोवेळी दखल घेऊन विविध आदेश दिले आहेत. बुधवारी (ता. ऑगस्ट) याचिका सुनावणीस निघाली असता याचिकाकर्त्यांनी खंडपीठाने वारंवार आदेश देऊनही रस्त्यांची दुरवस्था कशी कायम आहे याबद्दल छायाचित्रांसह सविस्तर शपथपत्र सादर केले.

त्यातीलकाही मुद्दे असे...
आठ कोटी खर्चूनही खड्डे : रंगाबाद-जालनारस्त्यावर २०१५ मध्ये तब्बल आठ कोटी रुपये खर्च केले आहेत. विमानतळ ते क्रांती चौकदरम्यानचा रस्ता तीन ठेेकेदारांनी तयार केला होता. तरीही त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत.

कार्यादेश देऊनही रस्ता अर्धवट : गोलवाडीते महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) या चार किलोमीटर रस्त्यासाठी जानेवारी २०१६ रोजी कार्यादेश दिले असून अद्याप हा रस्ता अर्धवट आहे. झालेल्या कामावरही खड्डे पडले आहेत. नवीन उड्डाणपुलाखाली खड्डे : मोंढानाका उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते तयार करून सहा महिनेही झाले नाहीत. असे असताना पुलाच्या बाजूच्या अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मनपातर्फे शहरातील पुलाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काम झाले. पण त्याचा उपयोग नाही.

तक्रारीसाठीवेबसाइट नाही : नागरिकांच्यातक्रारींसाठी वेबसाइट सुरू करावी. त्यावर नागरिकांना समस्यांचे फाेटो त्यावर लोड करता यावेत आणि महापालिकेने या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण केल्याचा फोटो टाकावा, असे खंडपीठाने आदेश दिले होते. यासंबंधी मनपातर्फे वेबसाइट सुरू केल्याचे हायकोर्टात सांगितले होते. परंतु संबंधित सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याचे अॅड. जैस्वाल यांनी निदर्शनास आणून दिले. मनपातर्फे २५६ कामांच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्याचे मनपाने जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात किती कामांना सुरुवात झाली हे स्पष्ट नाही, असेही निदर्शनास आणून देण्यात आले. महापालिकेतर्फे अॅड. राजेंद्र देशमुख, तर शासनातर्फे अॅड. एस. एस. दंडे यांनी काम पाहिले.

खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्स हॉटलिड प्लँटचा ठराव जानेवारी २०१६ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. तीन आठवड्यांत प्लँट सुरू करण्याचे शपथपत्र मनपाने सादर केले होते. मात्र, अद्यापही हा प्लँट सुरू केला नाही.

दुसरीकडे मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, खड्ड्यांची स्थिती बिकट आहे. अनेक रस्त्यांवर तात्पुरती दुरुस्ती करून भागणार नाही. तेथे नव्यानेच काम करावे लागणार आहे. अर्थसंकल्पात ज्या रस्त्यांची कामे आहेत ती प्राधान्याने घेतली जाणार आहेत. सध्या शहरात पडलेले खड्डे बुजवून नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी काही निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यातून लगेच ही कामे हाती घेतली जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...