आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनबद्ध विकासासाठी प्राधिकरण हवे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ कलमी जाहीरनामा जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करावे, अशी सूचना मराठवाडा जनता विकास परिषदेने जाहीरनाम्याद्वारे केली आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेच्या पदाधिका-यांनी तयार केलेला जाहीरनामा बुधवारी जाहीर करण्यात आला.

या जाहीरनाम्याच्या प्रती उद्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना दिल्या जातील, असे परिषदेचे सचिव सारंग टाकळकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, मनपाच्या नव्या कारभा-यांनाही जाहीरनामा दिला जाणार असून यातील सूचनांचा पुढील पाच वर्षे पाठपुरावा केला जाणार आहे. या वेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद अदवंत, प्राचार्य जीवन देसाई, प्रदीप देशमुख, मोहन फुले, मोहंमद शफी, शोभा कोरान्ने, ना. वि. देशपांडे, सुरेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

त्यातील काही मुद्दे असे
वाहतूक धोरण
पार्किंग, अतिक्रमणे, झेब्रा क्रॉसिंग, जड वाहतुकीच्या वेळेची मर्यादा, रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर अतिक्रमणे हटवणे, भुयारी मार्ग, नवीन रस्ते तयार करणे आदींसाठी स्वतंत्र वाहतूक धोरण जाहीर करावे. कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे.
घनकचरा व्यवस्थापन : कचरा निर्मूलनासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करावी. नागरिकांमध्ये जनजागरण मोहीम राबवावी. कचरा निर्मूलन विभाग अधिक सक्षम, अद्ययावत करावा. शहरात होऊ घातलेली भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या आणि सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापर प्रकल्पांची उभारणी निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावी.

आरोग्य सुविधा : महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय उभे करावे. त्यासाठी तातडीने पावले उचलावीत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियमित मूल्यमापन करावे.

उद्याने व क्रीडांगणे : जुन्या उद्यानांचे पुनरुज्जीवन करा. क्रीडांगणांना पुरेशा सुविधा द्याव्यात. ज्येष्ठांसाठी पदपथ, मुलांसाठी क्रीडा साहित्याची उभारणी करावी.

पर्यावरण निगा : मकबरा येथील वीटभट्ट्या हटवाव्यात. खाम नदीतील प्रदूषण कमी करावे. प्रमुख नाल्यांवरील अतिक्रमण काढावे.

प्राथमिक शिक्षण : दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमावी. मुलांना शैक्षणिक साहित्य गणवेशासह द्यावे. नियमित मूल्यमापन करावे.

सांस्कृतिक गरज : गारखेड्यात एक नाट्यगृह उभारावे. संत तुकाराम, संत एकनाथ रंगमंदिराची देखभाल करावी. महापौर चषक एकांकिका स्पर्धा दरवर्षी घ्यावी.

समांतरमधील अडथळे दूर करा : समांतर जलवाहिनी योजनेतील सर्व अडथळे दूर करावेत. नहरींचे पुनरुज्जीवन करून नवीन जलस्रोतांचा शोध घेतला जावा. यामुळे औरंगाबाद शहराचे जायकवाडीवरील अवलंबित्व कमी होऊ शकेल.

सोलार वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग : ज्या नागरिकांनी सोलार उपकरणे बसवली त्यांना मालमत्ता करात कायद्याप्रमाणे सवलत द्यावी. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करावे.

पर्यटननगरी
शहराला पर्यटननगरी करण्यासाठी पावले उचलवीत. पर्यटनस्थळांजवळ स्वच्छ पेयजल, स्वच्छतागृहे उभी करावीत. वाहनतळ असावेत. पालिकेचे स्वतंत्र पर्यटन माहिती केंद्र उभारावे. चौकांचे सुशोभीकरण करावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने कामांमध्ये सुसूत्रता आणावी.