आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन, परिश्रमाने मिळाले यश- 'गेट'मध्ये देशात १८ वा आलेल्या पीयूष हुरपाडे याचे मनोगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ हार्ड वर्क उपयोगाचे नाही, तर स्मार्ट वर्क करणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. नियोजनबद्धतेमुळे ठरवलेल्या गोष्टी योग्य वेळेत पूर्ण करता येतात. हेच नियाेजन तुम्हाला यश मिळवून देते, असे मनोगत ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंगमध्ये देशात १८ वा आलेल्या पीयूष हुरपाडे यांनी व्यक्त केले.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या या परीक्षेस देशभरातून १२ लाख विद्यार्थी बसले होते, तर कॉम्प्युटर ब्रँचमधून १ लाख १५ हजार विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांमधून आपली गुणवत्ता सिद्ध करत पीयूषने यश मिळवले आहे. ही परीक्षा ऑनलाइन होत असून परीक्षेत वजागुण पद्धती आहे. पीयूषने ७५.५६ गुण मिळवत देशातून १८ वा येण्याचा मान मिळवला आहे. संगणक अभियंता म्हणून जेएनईसी महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या पीयूषची कॅम्पस मुलाखतीत निवड झाली होती. एक वर्ष नोकरी केल्यावर पुन्हा अभ्यासाकडे वळायचे आणि गेट कॉलिफाय करायचे हा ठाम निश्चय केला होता.

परीक्षेची तयारी केवळ परीक्षेपुरतीच होता कामा नये. त्यात आपल्याला चांगले यश
मिळवता यायला हवे या उद्देशाने इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षापासूनच परीक्षेची तयारी सुरू केल्याचे पीयूषने सांगितले. अभ्यासक्रमातीलच काही भाग या परीक्षेत असल्यामुळे तयारी करणे देखील सोपे होते.

टेक्स्ट बुक्सचाही करा वापर
नियमित नोट्सचा सराव करताना जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे तसेच टेक्स्टबुक रेफर करण्याबरोबरच अधिकाधिक मॉक टेस्टलाही विद्यार्थ्यांनी सामोरे जावे. यामुळे परीक्षेबद्दलची भीती दूर होऊन आत्मविश्वासही वाढतो, असा सल्लाही पीयूषने विद्यार्थ्यांना दिला.

नवी दिशा मिळाली
या परीक्षेतील यशामुळे नवी दिशा मिळाली असून इन्स्टिट्यूट फॉर गेट कोचिंगमध्ये केलेली दोन वर्षांची मेहनत, प्रा.सतीश तांबट यांचे मार्गदर्शन, सराव आणि आई-बाबांचे सहकार्य यांना या यशाचे श्रेय आहे, असेही पीयूषने नमूद केले. आयआयटी मुंबई येथे पदव्युत्तरचे शिक्षण घेऊन इंडस्ट्रीमध्ये चांगले करिअर करण्याचा मानस असल्याचेही त्याने सांगितले.