आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : आजपासून शहरात प्लास्टिकबंदी, कर्मचाऱ्यांवर असणार जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराचा केंद्राच्या स्वच्छता अभियानात २९९ वा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरांतून मनपावर आरोप करण्यात येत होते. त्यामुळे आयुक्तांनी स्वच्छतेवर लक्ष दिले आहे. त्यासाठी सफाई मोहिमेसह ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीसाठी प्लास्टिकबंदीचाही बिगुल वाजवला आहे. त्यानुसार आजपासून ११५ वॉर्डांत काम करणाऱ्या सफाई जवानांसह स्वच्छता निरीक्षकांकडून हातगाडीवाले, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते आदींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच होलसेल दुकानदार आणि मोठ्या दुकानदारांवर वॉर्ड अधिकाऱ्यांकडून जप्तीची कारवाई करून दंड लावण्यात येणार आहे.
 
स्वच्छता अभियानात सपाटून मार खाल्ल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रशासनाने स्वच्छता राखण्यासाठी विविध मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यात प्लास्टिकबंदीसाठी दोन दिवसांपूर्वीच मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या सूचनेनुसार उपायुक्त  विक्रम मांडुरके यांनी वॉर्ड अधिकारी, ११५ जवान, २२ स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेतली. यात प्लास्टिकबंदीची जबाबदारी सर्वात खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यांवर दिली आहे. त्यांना दंड लावण्याचे अधिकार दिले नसले तरी बॅग जप्तीची आणि ज्यांच्याकडून कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याचे काम करावे लागणार आहे. नंतर पुन्हा त्यांच्याकडे कॅरीबॅग दिसून आल्यास त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे वॉर्डातील अधिकारी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करू शकणार आहेत. त्याचबरोबर याच कर्मचाऱ्यांकडून नाल्यात व डिव्हायडरवर कचरा टाकणाऱ्यांवरही वॉर्डांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मोठी कारवाई आणि दंड लावण्याचे अधिकार केवळ वॉर्ड अधिकारी आणि उपायुक्तांकडे ठेवण्यात आले आहेत.   
 
वॉर्डातील दुकाने, फळविक्रेते, हातगाडीची जवानांना माहिती : वॉर्डात नागरिकांना सर्वाधिक कॅरीबॅग या किराणा दुकान, काही मेडिकल, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांकडून देण्यात येते.
 
५ जून रोजी कॅरीबॅग बाळगणाऱ्या नागरिकांनाही दंड  
पाच जून जागतिक पर्यावरण दिनापर्यंत शहरातून कॅरीबॅग हद्दपार करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याच दिवशी शहरातील ज्या नागरिकांकडे कॅरीबॅग आढळून येईल त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी मनपाच्या घनकचरा विभागाकडून नियमित कॅरीबॅगचा वापर टाळावा, असा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.
 
आजपासून सर्वच वॉर्डांत मोहीम  
- शहरातील प्रत्येक वॉर्डात जवानांकडून काम करण्यात येणार असल्याने जलदगतीने मोहीम पार पडेल. तसेच वॉर्ड अधिकारी आणि आमच्या स्तरावरही आम्ही नियमित कार्यरत राहणार आहोत. नागरिकांनीही कॅरीबॅगचा वापर टाळावा. दोन दिवसांपूर्वीच काम सुरू झाले. जवान, स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी दिल्याने मोठ्या प्रमाणात एकाच  दिवशी काम सुरू होणार आहे. - विक्रम मांडुरके, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...