आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिथीनला नकार हाच प्रतिष्ठेचा आधार, प्लास्टिकमुक्तीसाठी पर्याय देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक गोष्टीला पर्याय दिला तर बदल घडून येतो याची प्रचिती "दिव्य मराठी'ने सुरू केलेल्या प्लास्टिकमुक्ती अभियानातून वारंवार येत आहे. शहर प्लास्टिकमुक्त करायचे असेल तर ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर होतो त्या ठिकाणी पर्याय देणे गरजेचे आहे. सिंक, बेसिन किंवा बाथरूमची स्वच्छता करण्यासाठी प्लास्टिक कॅरीबॅग्जचा वापर करण्याऐवजी हँडग्लोव्हजचा वापर करणे अधिक उपयुक्त आहे. शनिवारी सर्जिकल अँड डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी "दिव्य मराठी' कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी अनेक उत्तम पर्याय तर सांगितलेच, सोबतच ते उपलब्ध करून देण्याचीही ग्वाही दिली.

"दिव्य मराठी'ने प्लास्टिकमुक्त शहरासाठी अभियान सुरू केले आहे. कापडी पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या संस्था, संघटनांना व्यासपीठ दिले. याशिवाय कापडी पिशव्यांचा पुरस्कार करणाऱ्यांनाही प्रसिद्धी दिली. महिलांकडून करून घेतलेल्या सर्वेक्षणातून प्लास्टिक पिशव्यांचा नेमका वापर कुठे होतो याची माहिती जाणून घेतली. यामध्ये पुढे आलेल्या माहितीनुसार बेसिन, सिंक आणि बाथरूम स्वच्छ करताना ग्लोव्हजप्रमाणे पिशवी हातात घालून स्वच्छता करणे महिलांना सोयीचे वाटते. म्हणूनच सिंक, बेसिन सफाईसाठी कॅरीबॅग वापराला आजच्या चर्चासत्रादरम्यान उत्तम पर्याय देण्यात आले आहेत.
व्यवस्थापन गरजेचे
प्रत्येक घरात किमान ६० ते ७० टक्के कचरा खत बनवण्यासाठी उपयोगी येऊ शकतो. घरातून हा कचरा बाहेर जाता खतामध्ये रूपांतरित व्हायला हवा. ३० टक्के कचरा बाहेर जातो. त्याचे नियोजन केल्यास पर्यावरणाला मोठा हातभार लागेल. प्लास्टिकमुक्त शहर अभियान आता जरी ५० मायक्रॉन पिशव्यांपुरते मर्यादित वाटत असले तरीही कापडी पिशव्या जेव्हा जीवनशैलीचा भाग बनतील तेव्हा मोठे बदल घडतील.

सर्व केमिस्ट आणि ड्रगिस्टच्या दुकानांत अशा प्रकारचे ग्लोव्हज माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा अधिकाधिक लोकांनी फायदा घ्यावा. ‘दिव्य मराठी’च्या वतीने आवाहनपर स्टिकरच्या माध्यमातून दुकानदार जनजागृतीतही सहभागी होतील.

पदाधिकाऱ्यांनी सुचवलेले पर्याय
{पेपर डिस्पोजेबल ग्लोव्हज : हेग्लोव्हज खूप उपयुक्त आहेत. अतिशय हलके, वारंवार धुऊन वापरता येतील असे आहेत. रुपयात उपलब्ध होतो. १०, २५ आणि १०० ग्लोव्हजचे पाकीट किंवा सुटेही विकत घेता येतात.

{एक्झामिनेशन ग्लोव्हज : लेटेक्समटेरियलचा वापर करून हे ग्लोव्हज बनवले जातात. डिस्पोजेबलच्या प्रमाणात यांना अधिक वेळा वापरता येईल. पण यांची विल्हेवाट लावताना खबरदारी घ्यावी लागेल. कारण हे रिसायकल होत नाहीत. यांना मेडिकल वेस्ट म्हणून द्यावे लागते.

{प्लास्टिकग्लोव्हज : आणखीएक प्रकारचे ग्लोव्हज बाजारात उपलब्ध आहेत. पेपर डिस्पोजेबलपेक्षा हे थोडे अधिक टिकतात. रुपया २० पैशांपर्यंत त्यांची किंमत असू शकते.
शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्जिकल अँड जेनरिक डीलर असोसिएशनचा पुढाकार

सुरुवात स्वत:पासून
^मी दुकानात कधीच कॅरीबॅग देत नाही. जेव्हा मी कागदी पाकिटात औषधी देतो तेव्हा लोक म्हणतात, प्लास्टिक कॅरीबॅगऐवजी पाकीट देणारे तुम्ही पहिलेच आहात. तर मी उत्तर देतो, आता तुम्ही दुसरे झालात. प्लास्टिकऐवजी कागदी पाकिटाचा वापर कधीही पर्यावरणपूरक आहे. तुम्ही जिथे जाल त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवी घेऊ नका, मागूही नका. प्रल्हाद पारटकर, सदस्य,सर्जिकल अँड जेनरिक डीलर्स, असोसिएशन.

कचरा विभाजन महत्त्वाचे
^कचऱ्याचे व्यवस्थापनआणि विभाजन योग्यरीत्या होऊ लागले की आपोआपच पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांना आळा बसेल. हँडग्लोव्हजचा वापर निश्चितच चांगला पर्याय आहे. त्याचा वापर व्हावा म्हणून आम्ही शहरातील मुख्य बाजारपेठांतील सर्व दुकानांवर लोकांना परवडतील अशा दरात ते उपलब्ध करून देत आहोत. शिवाय जनजागृतीसाठी सर्व सदस्य सहकार्य करतील. अनंत बोरकर, सचिव,सर्जिकल अँड जेनरिक डीलर्स, असोसिएशन.

कॅरीबॅग्जचा वापर हायजिनिक नाही
^सामान्य कुटुंबांतील महिला हाताने साफसफाईची कामे उरकतात. मात्र, उच्च मध्यमवर्गात हायजिनिकतेला जास्त महत्त्व आहे. पण प्लास्टिक कॅरीबॅग्जचा वापर करणे ही बाब काही हायजिनिक नाही. याउलट ग्लोव्हज वापरणे हिताचे आहे. कायदा आणि जनजागृती दोन्हींनी हातात हात घेऊन चालणे गरजेचे आहे. -मकरंद दुनाखे, सदस्य.

अभियान नाही ही तर चळवळ
^कुठलेही अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृतीसोबतच इच्छाशक्ती आणि लोकसहभागाचा रेटा महत्त्वपूर्ण ठरतो. अभियानाबाबत घेतलेली सकारात्मक दिशाच त्याच्या यशाचे गमक आहे. हे अभियान राहिले नसून चळवळ झाली आहे. आमच्या क्षेत्राद्वारे यासाठी पर्याय द्यावा म्हणून पुढे आलो आहोत. -शैलेंद्र रावत, उपाध्यक्ष.

सर्व दुकानदार मदत करणार
^महिलांना माफक दरात उत्तम हँडग्लोव्हज उपलब्ध करून दिले तर त्याचा वापर वाढेल. पर्याय कोणता आहे अन् तो कुठे उपलब्ध होईल, सहज उपलब्ध झाला तर लोक नक्कीच त्याचा वापर करतील. "दिव्य मराठी'चे हे अभियान जीवनशैलीचा भाग झाले तर आपले शहर लवकरच स्वच्छ आणि सुंदर होईल. प्रवीण कुलकर्णी, उपाध्यक्ष,व्यापारी महासंघ

असोसिएशनतर्फे प्रचार, प्रसार करणार
^"दिव्यमराठी'ने प्लास्टिकमुक्त अभियान सुरू केल्याने शहरातील विविध भागांमध्ये मोठा बदल दिसून येत आहे. पण अभियान १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांकडून वर्षभर ते तितक्याच जोमाने राबवले जायला हवे. आमच्या असोसिएशनच्या वतीने प्रचार, प्रसार आणि पर्याय उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. मनोज शहा, अध्यक्ष.