आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारकाभाऊ, रिटायर होऊ नका लोकशिक्षणाचेच काम करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राजकारणात एखाद्या मोठ्या पदावरून पायउतार झाल्यानंतर दोन-तीन वर्षांत ओळख विसरून जाते. मात्र द्वारकाभाऊ पाथ्रीकर तीस वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर राहूनही एखाद्या कार्यक्रमात त्यांचे नाव निघाले नाही, असे होत नाही. हीच त्यांच्या कामाची पावती आहे. तुम्ही आता रिटायर होता मराठवाड्यात लोकशिक्षणाचे काम करावे, असा सल्ला माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
सिडको येथील संत तुकाराम नाट्यगृहात सोमवारी द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांचा अमृतमहोत्सव गौरव सोहळा पार पडला. या वेळी वळसे पाटील बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आमदार संजय शिरसाट, भाऊसाहेब चिकटगावकर, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, अब्दुल सत्तार, विक्रम काळे, माजी आमदार कल्याण काळे, माजी खासदार गणेश दुधगावकर, किशोर पाटील, जवाहरलाल गांधी, मधुकरअण्णा मुळे, सुरजितसिंह खुंगर, मनमोहनसिंग ओबेरॉय, प्रदीप देशमुख, जयाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
विकासासाठी एकत्र या : वळसेपाटील म्हणाले, राजकारणात अनेकांना सहज पदे मिळतात. शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांची उमेदवारी आठ दिवसांपूर्वी घोषित झाली अन् ते खासदार झाले. तुम्ही केवळ प्रयत्नवादावर विश्वास ठेवला. तुम्ही आता रिटायर होता मराठवाड्यात लोकशिक्षणाचे काम करा. मराठवाडा, कोकण विदर्भाचे प्रश्न वेगळे आहेत. उजनीचे पाणी, जायकवाडीचे पाणी त्या भागाला मिळाले पाहिजे म्हणून वाद होतात. आज राज्यातील लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. तो समाजकारणात आणि राजकारणातही आला आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षपदानंतरही शहरात घर नव्हते
पाथ्रीकर म्हणाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सोडल्यानंतर शहरात राहण्यासाठी घर नव्हते. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे पुढचा काही काळ माझे कुटुंबासाठी गांधी तसेच काही जणांनी महिन्याला हजार रुपयांची मदत केली. विठ्ठल लहाने यांनी एक वर्ष किरायाही घेतला नाही. उलट घर बांधण्यासाठी मदत केली. चांगले काम करणाऱ्यांना पाठिंबा देणार असल्याचे ते म्हणाले.
आमदारकीसाठी शरद पवारांना सांगतो
द्वारकाभाऊ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. मात्र त्यांना आमदारकी मिळाली नसल्याची खंत कैलास पाटील यांनी व्यक्त केली. तेव्हा आमदार शिरसाट यांनी तुम्ही वळसे पाटील यांना कशाला सांगता, बाजूला हरिभाऊ बागडे आहेत. त्यांना सांगितले तर काम होऊ शकते, असे मत व्यक्त केले. त्यावर बोलताना बागडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाहता ते एक आमदार निवडून आणू शकतात. त्यामुळे वळसे पाटलांनी शरद पवारांशी बोलावे, अन्यथा माझी शरद पवारांशी २७ तारखेला अरविंद गोरेंच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त भेट होणार आहे. मी दिलीप वळसे पाटील यांच्या वतीने निरोप देतो, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
बातम्या आणखी आहेत...