आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशी खेळांत निपुण खेळाडू होणार पोलिसांत अधिकारी; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस आयुक्तालय तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे इतर मान्यवर. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
पोलिस आयुक्तालय तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे इतर मान्यवर. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद- कुस्ती खो- खो, कबड्डी अशा देशी खेळांत नैपुण्य मिळवणारे खेळाडू पोलिस दलात क्लास वन अधिकारी बनू शकतात. यासाठी स्वतंत्र धाेरण तयार करण्यात अाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. औरंगाबादेत पोलिस कर्मचाऱ्यांसाठीच्या नवीन वसाहतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. 

महाराष्ट्र केसरी, खान्देशातील मल्ल विजय चौधरीला पोलिसांत नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, वर्ष उलटूनही त्यावर अंमलबजावणी झाली नाही, याकडे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, “नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशीच चाैधरींना नाेकरी देण्याबाबतचा निर्णय झाला होता. विशेष म्हणजे या खेळाडूंना पोलिस दलात क्लास वन अधिकारी म्हणून घ्यावयाचे आहे. यासाठी स्वतंत्र धाेरण तयार केले असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य ती पदे देण्यात येतील.’
 
या वेळी गृह राज्यमंत्री रणजित पाटील, दीपक केसरकर, वक्फचे अध्यक्ष एम. एम. शेख, महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर, पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर, विष्णुदेव मिश्रा, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, अतुल सावे, महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, आयजी अजित पाटील, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. सूत्रसंचालन नीता पानसरे, आभार स. पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी उपायुक्त संदीप आटोळे, राहुल श्रीरामे, वसंत परदेशी, स. आयुक्त रामेश्वर थोरात, गोवर्धन कोळेकर आदींनी परिश्रम घेतले. 

पोलिसांची क्रीडा क्षेत्रात कामगिरी 
पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांनी महाराष्ट्र पोलिस दलाने क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याचे सांगितले. जाेधपूर, कर्नाटक येथील स्पर्धांत महाराष्ट्र पोलिसांचा संघ विजेता ठरला आहे. कबड्डी, हॉकी, अॅथलेटिक्स, वेट लिफ्टिंगसह कमांडाे ट्रेनिंगमध्येही पाेलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे ते म्हणाले.
 
शहर सीसीटीव्ही नजरेखाली आणा 
औरंगाबाद शहर स्मार्ट होताना ते सेफ्टी होणेही आवश्यक आहे. यासाठी पोलिसांनी आग्रही भूमिका घ्यावी. शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस मुख्यालयात स्वतंत्र कमांड अँड कंट्रोल रूम असणे आवश्यक आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. 

वसाहतींसाठी २०० कोटी मंजूर 
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या दोन वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस वसाहती बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात नवीन पोलिस आयुक्तालय आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. तिसगाव परिसरात वसाहत उभारली जात आहे. या सर्व प्रकल्पांसाठी वर्षभरात २०० कोटी रुपये मंजूर केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्वत:चे घर मिळावे यासाठीही राज्य शासन पुढाकार घेणार आहे. यासाठी शासकीय किंवा खासगी जमीन शोधावी. ती कमी किमतीत देण्यासाठी शासन पुढाकार घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...