आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराच्या चारही बाजूंनी होतेय २० बाय ३० ची प्लॉट विक्री!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेने नुकतीच धडक कारवाई करताना हर्सूल ते पिसादेवी रस्त्यावरील २० बाय ३० आकाराच्या भूखंडांची विक्री थांबवली. येथे किमान १०० प्लॉट दिवाळीच्या मुहूर्तावर विकले जाणार होते. कोणतेही ले-आऊट नाही, मोठे रस्ते नाहीत, ड्रेनेज लाइन नाही, महानगरपालिकेकडे नोंद नाही की जमीन निवासी वापराची नाही, तरीही भूखंड विक्री होऊन काही दिवसांत तेथे वसाहत होते आणि शहराच्या गुंठेवारी वसाहतीच्या संख्येत आणखी वाढ होते. एक कारवाई करून पालिका अधिकारी मोकळे झाले. प्रत्यक्षात शहराच्या चारही बाजूंनी शुभ मुहूर्तावर अशा भूखंडांची जोरदार विक्री सुरू आहे. त्यामुळे पालिकेने एका कारवाईवर थांबता नियमितपणे अशी मोहीम सुरू ठेवावी, असे बांधकाम व्यावसायिकांनी म्हटले आहे.
अवैध प्लॉट विक्री तसेच बांधकामे सुरू आहेत, हे सर्वांना दिसते. नगरसेवकांकडून तर थेट मदत होते. त्यांना मूलभूत सुविधाही दिल्या जातात; परंतु पालिका अधिकाऱ्यांना यातील काहीही दिसत नाही. इमारत निरीक्षकांना तर वेगळ्या चष्म्याची गरज असल्याचे दिसते. पूर्वीपासून या बांधकामांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने निम्मे शहर आज अशा अस्ताव्यस्त भागात वास्तव्य करते.

गुंठेवारी वसाहतीत भर : शहरातगुंठेवारीच्या १२७ वसाहती असल्याची जुनी नोंद पालिकेकडे आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडत असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांना आहे, परंतु त्यांना कोणी थांबवत नाही.
अशा वसाहतीत जेव्हा लोकसंख्या वाढते, मूलभूत सुविधा देताना जेव्हा ताण वाढतो, तेव्हा याकडे बघितले जाते. गुंठेवारीतील भूखंड विक्री थांबवणे हाच त्यावर प्राथमिक पर्याय आहे. तक्रारी आल्यानंतर आम्ही कारवाई करतो, हर्सूल येथील तक्रार येताच आम्ही तेथील विक्री थांबवली, असे अतिक्रमण विभाग प्रमुख तथा उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले. थोडक्यात जेथे तक्रार नसते तेथे कारवाई होत नाही म्हणजेच पालिकेचे इमारत निरीक्षक स्वत: रस्त्यावर फिरून कारवाई करत नाही हे स्पष्ट होते.

चिकलठाणा-मुकुंदवाडी
मुकुंदवाडीच्या मूळ गावात जागा शिल्लक नसली तरी पुढे अंबिकानगरापासून ते थेट बीड बायपासपर्यंत अशी बांधकामे सुरू आहेत. अंबिकानगरात तर १० बाय १० किंवा २० चे भूखंड विकण्यात आले आहेत. विमानतळ परिसर सोडला तर चिकलठाण्यातही अशीच परिस्थिती आहे. अधिकृत ले-आऊटच्या बाजूला अनधिकृत प्लॉटिंग हे समीकरण ठरलेले आहे.

हर्सूल गाव आणि त्यालगतचा परिसर
मूळ हर्सूल गाव आणि त्यालगत विकसित झालेल्या नव्या वसाहतींना लागून मोठ्या प्रमाणावर असे भूखंड विकले जातात. जटवाडा रस्त्यावर जागोजागी असेच भूखंड विकले जात असून त्यावर बांधकामेही होत असल्याचे दिसेल. हर्सूल तलावापासून पुढे सहा किलोमीटरवर ग्रीन बेल्टमध्ये विक्रीबरोबरच बांंधकामेही पूर्ण झाली आहेत.

पडेगाव, मिटमिटा तसेच भावसिंगपुरा या भागातही दररोज भूखंडांची विक्री होते तसेच बांधकामेही केली जातात. गोगाबाबा टेकडीच्या पश्चिम दिशेने मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली असून डोंगरावरही भूखंडांची विक्री झाली आहे. कत्तलखान्याच्या पुढे चार किलोमीटरपर्यंत अवैधपणे बांधकामे सुरू आहेत.

पैठण रस्ता
पैठण रस्त्यावरील नक्षत्रवाडी-कांचनवाडीपासून ते साताऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर अशी बांधकामे सुरू आहेत. तेथे अजूनही प्लॉटची विक्री सुरू आहे. सातारा देवळाईतील निम्मा भाग हा अवैध वसाहत म्हणून ओळखला जातो. या परिसराचा समावेश महानगरपालिकेत झाल्यानंतर पालिकेकडून येथे कारवाई हाती घेण्यात आली खरी, परंतु ती लगेच थंड बस्त्यात गेली. किमान जायला रस्ते हवेत म्हणून ही कारवाई करण्यात आली. मात्र, जेथे सध्या प्लॉटची विक्री सुुरू आहे, तेथे मात्र पालिकेचे पथक पोहोचले नाही.
बातम्या आणखी आहेत...