आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न बघा, स्वप्न जगा; गीतकार प्रविण दवणेंचा विद्यार्थ्यांना सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रत्येक यशस्वी व्यक्तीने स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवले. जगात प्रत्येक गोष्ट दोन वेळा निर्मित होते, एकदा स्वप्नातील आपल्या विचारांत आणि दुसर्‍यांदा प्रत्यक्षात येते. प्रत्येकाने विविधरंगी स्वप्न पाहावे, पण जागेपणीही स्वस्थ बसू देणार नाही असे स्वप्न पाहावे, असे मत व्यक्त करतानाच स्वप्न पाहा आणि स्वप्न जगा असा सल्ला गीतकार प्रवीण दवणे यांनी दिला.

सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहामध्ये प्रोग्रेसिव्ह क्लासेसच्या ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा, स्वप्नांना पंख प्रेरणेचे’ याविषयावर विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संचालक सचिन चव्हाण, कल्पना चव्हाण, जायंट्सचे विनोद अग्रवाल, दिनेश मालाणी यांची उपस्थिती होती.

दवणे पुढे म्हणाले, माझ्या आयुष्यात अनेक संघर्षात्मक प्रसंग आले. मी कुठल्याही संकटाशी हरलो नाही. मीच नव्हे जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने संघर्षातून यश संपादन केले. हार साजरी करण्याचे कौशल्य ज्याने अवगत केले तो यशर्शी खेचून आणतो. प्रोग्रेसिव्ह क्लासेस विद्यार्थ्यांना फक्त 12 वी किंवा इतर परीक्षा पास होण्यासाठी मार्गदर्शन देत नाही, तर आयुष्याची परीक्षा पास होण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. हा अतिशय जबाबदार उपक्रम यांनी हाती घेतला आहे. स्पर्धेत धावण्यात खरा आनंद आहे. तो आनंद एकदा का अनुभवला म्हणजे आयुष्याचे अनेक अर्थ उलगडत जातात.

विद्यार्थी दशेत असताना परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे आव्हान असते. मात्र, दूरदृष्टीने त्यापलीकडे पाहत आयुष्याच्या स्पर्धेवर जे आपले लक्ष केंद्रित करतात ते यशाच्या मालिका उभारत जातात. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन विविध शंकांचे निरसन केले.

संचालक चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच उत्तम माणूस बनण्यासाठीचे गुण संपादन करण्यावर लक्ष द्या असे सांगितले. या वेळी इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. विशाखा रुपल यांनी सूत्रसंचालन केले.

अशी झाली प्रश्नोत्तरे
प्रश्न : अभ्यास करावा वाटत नाही काय करावे?
उत्तर :अनेकदा लक्ष भरकटल्यामुळे अभ्यास न करण्याचे मन तयार होते. मुख्यत: अभ्यास का करायचा, त्याचा आपल्या जीवनात काय फायदा आहे याविषयी गहन चिंतन केल्यास मनात असे विचार येणार नाहीत.

प्रश्न : अभ्यास विसरतो, गोंधळ होतो काय करावे?
उत्तर: मनात अनेक विचार सैरभैर फिरत असतात. अभ्यास करताना मन एकाग्र होत नाही. त्यामुळे अंतरमनाशी संवाद साधा आणि आपल्याला हवे असलेल्या स्वप्नांची, यशाची त्याला पूर्ण जाणीव करून द्या.

विद्यार्थ्यांना दिशा देणारा अनोखा उपक्रम, प्रेरणादायी व्याख्याने
खासगी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास एक अभ्यास हेच शिकवले जाते. मात्र, या क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेच्या स्पर्धेतच यशस्वी होण्यासाठी नव्हे, तर आयुष्याच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले जाते. दर सहा महिन्यांना क्लासतर्फे प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी डॉ. विठ्ठल लहाने, रा. रं. बोराडे, सचिन जोशी, इंद्रजित कदम, बा. ह. कल्याणकर आणि कृष्णा भोगेंसारख्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे.