आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poet Guljar Statement On Conversation And Peshawar Attack

धर्मांची एक्स्पायरी उलटून गेली; आता औषध बदलण्याची वेळ, गुलजार यांचे परखड भाष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औषधावर एक्स्पायरी डेट असते. ती निघून गेल्यावर औषधाचे विष होते. धर्मांचेही तसेच झाले आहे. धर्मांची एक्स्पायरी डेट कधीच उलटून गेली आहे. आता औषध बदलण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत ख्यातनाम कवी, शायर, लेखक गुलजार यांनी दहशतवादावर भाष्य केले. पाकिस्तानात अतिरेक्यांनी शाळकरी मुलांची केलेली नृशंस हत्या पाहता याला कुठे अंत नाही का, असा प्रश्न मला छळत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
‘मिर्झा गालिब' पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मृदू स्वभावाचे गुलजार पाकिस्तानातील शाळकरी मुलांच्या हत्याकांडाने खूपच व्यथित झाले होते. ते म्हणाले, त्या मुलांचा काय दोष? त्यांनी ना आपल्या मर्जीने आईबाप निवडले, ना देश. पण त्यांना अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडावे लागले. या घटनेच्या बातम्या पाहून मी आतून दुखावला गेलो आहे. समोर लहानगी मुले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडायला अतिरेक्यांचा हात धजावलाच कसा, या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. त्या दिवशी टीव्ही पाहत होतो. ते बघणे सहन होत नव्हते. असह्य झालो की टीव्ही बंद करायचो. शांतता असह्य झाली की पुन्हा लावायचो तर तिथे तेच. आमच्या पिढीला फाळणीच्या वेळच्या कत्तली हे सर्वात निर्घृण कृत्य वाटायचे. पण आता तसे नाही. पेशावरचा प्रकार पाहता याला कुठे अंत नाही का, असा प्रश्न मला छळत आहे.
मराठी कविता संपन्न
साहित्यात मराठी, बंगाली, मल्याळमचे स्थान मोठे आहे. मराठी कविता संपन्न आहे. अरुण कोलटकर, दिलीप चित्रे ही प्रभावी नावे आहेत. कुसुमाग्रजांच्या कवितांचे भाषांतर पूर्ण केले. दलित कविताही समृद्ध आहे. त्यावर काम करणार आहे. सध्या ईशान्येकडची कविता सर्वोत्तम वाटते. येथील २०० कवींच्या ३०० कवितांचे भाषांतर सुरू आहे. पुढील वर्षी तो संग्रह येईल.