आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शुक्रतारा’ वाचून दाखवायचा धीर होत नाही, मंगेश पाडगावकर यांची कोपरखळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माझी पहिली कविता 1943 मध्ये मी 14 वर्षांचा असताना लिहिली. ‘तव चिंतनी मन गुंगुनी’ ही कविता माझ्याच वयाच्या एका मुलीला पाहून लिहिली. पण कधी ती वाचून दाखवायची हिंमत झाली नाही. ‘शुक्रतारा मंद वारा’ आजही म्हणून दाखवायचा धीर होत नाही, अशी कोपरखळी करत ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकरांनी श्रोत्यांना दोन तास धमाल हसवले.

भानुदास चव्हाण सभागृहामध्ये जयंत शिरडकर यांच्या ‘स्वत:शीच’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी ते शनिवारी (13 जुलै) शहरात आले होते. या वेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून कवी, गीतकार प्रा. दासू वैद्य, जयंत शिरडकर, श्रीकांत उमरीकर, विद्याधर रिसबूड यांची उपस्थिती होती. पाडगावकर म्हणाले, शिरडकरांनी लिहिलेल्या कविता या चिंतनशील, वातट्रिका आणि प्रेम व्यक्त करणार्‍या तसेच जीवनाची शोकांतिका सांगणार्‍या आहेत. वैविध्यपूर्ण कवितांचा हा अनोखा संग्रह आहे. यामध्ये शब्दांच्या नेमकेपणाचे भान कसोशीने पाळले आहे. चारोळी कमी शब्दांत असल्याने मस्त शब्द बसवले आहेत.

यानंतर रिसबूड यांनी पाडगावकरांना बोलते करत विविध कवितांचे संदर्भ आणि त्या वेळच्या गमतीजमती जाणून घेत त्या सर्वांपुढे आणल्या. पाडगावकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत सबंध सभागृहाला हसवत ठेवले. या वेळी ‘ह्यांचे असे का होते कळत नाही’ ही कविता सादर करत त्याचे संदर्भ देताना सभागृहाला खळाळून हसवले. ‘शुक्रतारा मंदवारा’ या गाण्याला 50 वर्षे पूर्ण झाली. या गाण्याने अनेकांच्या प्रेमकहाण्या शेवटास नेल्या. मात्र ही कविता कुणाला वाचून दाखवायला मी अजूनही धजावलो नाही, असे त्यांनी सांगितले. पावसाळी वातावरण असल्याने ‘श्रावणात घन निळा बरसला’ या कवितेच्या आठवणीही त्यांनी जाग्या केल्या. ‘अंतरंग’ यावर बोलताना शिरडकर म्हणाले, स्वप्नांशी निगडित ही कविता आहे. पूर्ण न झालेली मात्र हृदयाच्या जवळ असलेली ही स्वप्ने आहेत, ती मी ‘अंतरंग’मध्ये उलगडली. प्रारंभी शिरडकर यांनी प्रास्ताविक केले. महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले.

कवी प्रामाणिक असला की उत्तम लिहितो : वैद्य
प्रत्येक कविता लिहिताना तिच्यामध्ये कल्पकतेसोबतच विविध अनुभव असतात. जेव्हा कवी प्रामाणिक असतो तेव्हाच तो उत्तम लिहितो, असे मत प्रा. दासू वैद्य यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, या कवितासंग्रहाचे शीर्षक अतिशय सर्मपक आहे. माणूस संपूर्ण जगाशी संवाद साधताना स्वत:शी मात्र विन्मुख झाला आहे. इतरांवर प्रेम करायचे असेल तर आधी स्वत:वर प्रेम करा. हा कवितासंग्रह म्हणजे चारोळ्यांचा उत्तम नमुना आहे.