आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे दु:ख विसरून बळीराजाने केला पोळा साजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - पाऊस दडून बसल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा या वर्षी दुष्काळाचे सावट पसरले आहे. तरीही हे दु:ख विसरून वाळूज परिसरातील शेतकर्‍यांनी आपल्या लाडक्या बैलांसमवेत पोळा सण साजरा केला.

ग्रामीण भागात पोळ्याच्या सणाला मोठे महत्त्व आहे. शेतीत वर्षभर राबणार्‍या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा केला जातो. शेतकरी दरवर्षी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे वाळूजसह परिसरातील गोलवाडी, तिसगाव, साजापूर, घाणेगाव, जोगेश्वरी, इटावा, लांझी, पिंपरखेडा, नारायणपूर, नायगाव, रामराई, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, रांजणगाव शेणपुंजी भागात खरीप पिकांनी मान टाकायला सुरुवात केली आहे. एकही मोठा पाऊस झाला नसल्याने परिसरातील सर्व जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसावर खरीप पिके तरारली होती. मात्र, आता पाऊस नसल्याने त्यांची वाढ खुंटली असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

साज चढवलेले बैल मारुती मंदिरासमोर
शेतकर्‍यांनी बैलांना विहिरीतील पाण्याने स्वच्छ धुतले. त्यानंतर त्यांना खास पोळा सणासाठी राखून ठेवलेल्या चराई क्षेत्रात सोडण्यात आले. सायंकाळी घरी आणून त्यांच्या शिंगांना हिंगूळ, बेगड लावण्यात आले. नव्याने वेसण, कपाळावर गोंडा व बाशिंग, नाकावर मोरकी, अंगावर झूल, पायात बारिक घुंगरांचे पट्टे, गळ्यात घुंगरमाळा, कवड्यांचे गेठे, विविध रंगांतील फुगे अशा पद्धतीने बैलांना साज चढवून मारुती मंदिरासमोर नेण्यात आले. त्यानंतर महादेव मंदिर, शनी मंदिर, गणपती मंदिर, भवानीमाता मंदिर, बिरुबा मंदिर अशा विविध मंदिरांचे दर्शन घेऊन पोळा फुटला. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बैलांची पूजा केली जात होती.