आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळाच्या सावटाखाली भरवला सर्जा-राजाला घास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- दुष्काळाच्या सावटाखाली बळीराजाने पोळ्याचा सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदा उत्साह नसला तरी झुली, घुंगरमाळा आदी साज वापरून बैलांना सजवण्यात आले होते. अडचणी तर येतच राहणार; पण वर्षातून एकदा येणाऱ्या या सणासाठी तडजोड करता शेतकऱ्यांनी सर्जा-राजाला आनंदाने पुरणपोळीचा घास भरवला.
पोळा म्हटले की १५-२० दिवस अगोदरपासून तयारी सुरू होते. बैलांना सजवण्यासाठी साहित्याची खरेदी, मिरवणुका, शेतगड्यांना कपडे घेणे, गोडधोड खाऊ घालणे असे उत्साही वातावरण असते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वाळूजसह परिसरातील गावांमध्ये पोळा दरवर्षीसारखा साजरा झाला नाही. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच पशुधनाची संख्या कमी होत असल्याने त्याचाही परिणाम पोळ्यावर झाला. पोळ्यापर्यंत का होईना पाऊस पडेल, या आशेवर बळीराजा होता. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला. रांजणगावातील सावता माळी मंदिर, वळदगाव येथील मारुती मंदिरात पोळ्याचा दरवर्षी असणारा उत्साह यंदा जाणवला नाही. आहे त्या झुली, घुंगरमाळा आदी साज वापरून बैलांना सजवण्यात आले होते. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या नळांवर, वॉशिंग सेंटरवर शेतकऱ्यांनी बैल धुतले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

परिसरातील गोलवाडी, तिसगाव, पंढरपूर, पाटोदा, नायगाव, आसेगाव, रांजणगाव शेणपुंजी, वडगाव (कोल्हाटी), जोगेश्वरी, लांझी, पिंपरखेडा, नारायणपूर, घाणेगाव, करोडी, वाळूज, रामराई आदी या गावांत पोळा सण शांततेत साजरा करण्यात आला. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्यासह पाच अधिकारी, ३६ पोलिस कर्मचारी, ३० होमगार्ड असा बंदोबस्त परिसरात तैनात होता.

परिसरातील निमशहरी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाजनगर, सिडको वाळूज महानगर येथील नागरिकांनी यंदा बाजारात सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोड्यांच्या खरेदीवर अधिक भर दिला. शाडू मातीच्या बैलजोडीच्या तुलनेत स्वस्त आकर्षक असणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोड्यांची विक्री जास्त झाल्याचे विक्रेते उदित श्रीवास्तव यांनी सांगितले.

पावसाचा सुखद धक्का
पावसाच्याप्रतीक्षेत असणाऱ्यांना पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी सहा वाजता पावसाने सुखद धक्का दिला. औद्योगिक परिसरात सुरुवातीला मध्यम, तर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. दरम्यान, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, पाटोदा, वळदगाव आदी परिसरातील वीज गुल झाली होती.