आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० रिक्षांवर पोलिसांची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नियमधाब्यावर बसवून शालेय वाहतूक करणाऱ्या ५० रिक्षांवर बुधवारी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. "दिव्य मराठी'ने या अवैध वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी चालवलेल्या अभियानाचे गांभीर्य लक्षात घेत सहायक पोलिस आयुक्त खुशालसिंग बाहेती यांनी नियम तोडणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आजपासून या कारवाईत अधिक तीव्रता आणण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
आठ दिवसांपूर्वी रिक्षाचालकाने मुलींवर अत्याचार केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी नियम धाब्यावर बसणाऱ्या रिक्षांवर कारवाई करा, असे आदेश देऊनही कारवाई होत नव्हती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन दिवसांपासून विविध शाळांच्या बाहेर कशा प्रकारे रिक्षाचालक मुलींना आणि मुलांना ड्रायव्हर सीटवर बसवतात हे "दिव्य मराठी'ने निदर्शनास आणून दिले. मनविसेनेदेखील पालक आणि रिक्षाचालक यांच्यात जागरूकता यावी म्हणून मंगळवारी आंदोलन केले.
त्यानंतर पोलिसांनी औरंगपुरा, सिडको, छावणीबरोबरच शहरातील विविध शाळांसमोर शाळा सुटण्याच्या वेळी दुपारी संध्याकाळी कारवाई केली. ड्रायव्हर सीटवर बसवणाऱ्या रिक्षाचालकांना १०० रुपयांचा दंड करत पुन्हा असे करू नका, असा दमही दिला. दिवसभरात विविध रिक्षाचालकांना मिळून सात हजार रुपयांचा दंड करण्यात आला, तरीदेखील काही भागांत ड्रायव्हर सीटवर विद्यार्थ्यांना बसवून वाहतूक सुरूच होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक सोपान बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक जगरे, राठोड यांच्यासह १५ ते १६ कर्मचारी आणि बीट मार्शलचा सहभाग होता.
चालकाशेजारी मुले बसवल्याने पोलिसांनी रिक्षांवर कारवाई केली.