आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Administration Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंडांना पोलिसी हिसका; शस्त्रेही जमा, निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्तांची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज असून 800 पेक्षा अधिक उपद्रवी मूल्य असणा-या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय 1070 पैकी 830 परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. निवडणुकीत सीआरपीएफ जवानांनाही पाचारण केले जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिली. उस्मानपुरा ठाण्यात शुक्रवारी (२६ सप्टेंबर) जनता दरबारानिमित्त ते आले होते. त्या वेळी त्यांच्याशी 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने खास बातचीत केली.
विधानसभा निवडणुका निर्विघ्न आणि पारदर्शकपणे पार पाडणे पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून त्यासाठी नियोजन सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत 800 पेक्षा अधिक गुंड, हीरोगिरी करणारे कार्यकर्ते आणि मागील निवडणुकांमध्ये गोंधळ घालणाऱ्यांचा पूर्वेतिहास तपासून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली गेली. काही जणांकडून बंधपत्रे घेण्यात आली आहेत, तर बहुतांश जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शंभरवर उपद्रवींना गजाआड करण्याची तयारीही सुरू आहे. पुढील पंधरा दिवस आणखी काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पोलिसी हिसका दाखवण्यात येणार आहे. हा आकडा दीड हजारावर जाण्याची शक्यताही पोलिस आयुक्तांनी वर्तवली आहे. ते म्हणाले, निवडणूक काळात आमच्याकडे असलेले पोलिस बळ पुरेसे आहे. मात्र, व्हीव्हीआयपी शहरात आल्यास पोलिस यंत्रणेवरील ताण वाढतो. मतदान शांततेत आणि निर्भीडपणे व्हावे म्हणून एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्या मागवण्यात येणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्तांचा प्राधान्यक्रम
मतमोजणीपर्यंत व त्यानंतरही शांतता व जनतेमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण कायम ठेवणे.
शहरात येणारे व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांना सुरक्षा प्रदान करणे.
अफवांवर नियंत्रण ठेवत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पाडणे.
धमकावणा-यांना आळा घालणे, त्यांना वेळीच तंबी देणे.
इन्कम टॅक्स विभागासोबत समन्वयाने काळ्या पैशांवर जप्तीची कारवाई करणे
काहींना पिस्तूल बाळगण्याची मुभा
शहरातील 14 पोलिस ठाण्याअंतर्गत 1070 परवानाधारकांकडे पिस्तुले आहेत. त्यापैकी 830 जणांची पिस्तुले जमा करण्यात आली. उर्वरित पिस्तुलेही जमा करण्याचा प्रयत्न आहे. आढावा समितीच्या बैठकीत काही जणांना या निर्णयामधून शिथिलता देण्यात आली आहे. त्यामध्ये बँकर्स, सुरक्षा रक्षक तथा अधिकारी, कॅश जमा करणारे कर्मचारी, सराफा, मोठे कंत्राटदार आणि ज्यांच्या जीविताला भीती आहे असे व्यापारी व उद्योजकांना पिस्तुले बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे.