आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना ड्रायव्हर सीटजवळ बसवाल, तर खबरदार, रिक्षाचालकांना पोलिसांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खबरदार, शाळांतील मुला-मुलींना ड्रायव्हर सीटशेजारी बसवाल तर, असा इशारा वाहतूक पोलिस विभागाने रिक्षा, मिनिडोर चालकांना दिला आहे. असा प्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी बजावले आहे. मात्र, केवळ इशारा देऊन चालणार नाही, तर पोलिसांनी खऱ्या अर्थाने जागरूकतेचा प्रत्यय देत अशा चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक रिक्षा, मिनिडोरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती करावी, असेही पालकांचे म्हणणे आहे.
शहराच्या मध्यवस्तीतील शालेय विद्यार्थिनीवर दोन रिक्षाचालकांनी अमानुष बलात्कार केला. तत्पूर्वी सहा महिने ते तिचे लैंगिक शोषण करत होते. तिला मारहाण करत तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. ही घटना उघडकीस आल्यावर पालक हादरले आहेत. कारण दररोज किमान २० हजार मुली-मुले रिक्षा, मिनिडोरमधून शाळेत ये-जा करतात. अनेक रिक्षाचालक मुलींना स्वत:जवळ बसवून घेतात. मुलांबाबतही असा प्रकार होतो. रिक्षाचालकांच्या दादागिरी, अरेरावीमुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईस पालक धजावत नाहीत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी रिक्षाचालक संघटनांची बैठक घेतली. त्यात सज्जड इशारा दिला. पालक विश्वासाने आपल्या मुली तुमच्याकडे सोपवत असतात. त्याचा गैरफायदा घेऊ नका. मुलांना कोंबून बसवू नका, असेही त्यांनी बजावले.
याशिवाय त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकालाही शाळांमध्ये मार्गदर्शन वर्ग घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार सेंट जॉन शाळा, जळगाव रोड येथे आज पथकाच्या प्रमुख सुनीता मिसाळ यांनी पालक, शिक्षकांना सूचना केल्या. आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याची माहिती दिली. रिक्षा तसेच मिनिडोर चालकाचा मोबाइल क्रमांक, पत्ता आदींची नोंद घ्या. पोलिसांकडून चालकाविषयी खात्री करून घ्या. त्यानंतरच मुलांना त्याच्याकडे सोपवा, असे त्यांनी सांगितले. त्यावर रिक्षा, मिनिडोरमध्ये सीसीटीव्हीची सक्ती करा. मुला-मुलींना जवळ बसवून घेणाऱ्यांवर धडाक्यात कारवाई करा, अशी मागणी पालकांनी केली. सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनीही त्यांना असा प्रकार आढळल्यास शाळेचे व्यवस्थापन, पालकांना, पोलिसांना कळवावे, असेही आवाहन त्यांनी केले. सिडकोतील रहिवासी मदालसा कानडे म्हणाल्या की, पोलिसांनी नियम पाळण्याची सक्ती केली तर मुलींवर अत्याचार करण्याची हिंमतच होणार नाही. मनसे शिक्षकेतर सेनेचे जिल्हाध्यक्ष बिजू मारग म्हणाले की, रिक्षा, मिनिडोरमध्ये सीसीटीव्ही अत्यावश्यक आहेत. सेंट जॉनच्या प्राचार्य मनवीनकौर पावा म्हणाल्या की, मुलींना सक्षम करण्यासाठी आम्ही िवविध उपक्रम हाती घेतले आहेत.