औरंगाबाद- रस्त्यानेपायी जाणाऱ्या तरुणाला पोलिस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या तोतया पोलिसाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्या विरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजम खान अफजल खान पठाण (४७, रा. मलकापूर, ता. बुलढाणा) असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे.
निराला बाजारात राहणारा अमोल देविदास बोराडे (२३) हा तरुण सिल्लोडला काही कामानिमित्त गेला होता. दरम्यान तो सोमवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकात उतरला तेथून निराला बाजारकडे पायी जाताना त्याला आजम खान या भामट्याने सिद्धार्थ उद्यानासमोर अडवले आणि त्याला ‘मी पोलिस आहे. तुझ्याकडे गांजाच्या पुड्या असून तुझी अंगझडती घ्यायची आहे.’ असे म्हणून बतावणी केली. अमोल बोराडे यास रस्त्याच्या एका कडेला नेले त्याच्या पँटच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेत पळ काढला. अमोलला संशय आल्याने त्याने तत्काळ मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर असलेल्या वाहतूक पोलिस चौकीतील पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घडलेली हकिगत कथन केल्यानंतर निरीक्षक मुदीराज यांच्यासह एस. बी. जोशी, आर. एस. गोलवाल, के. डी. कुलकर्णी, पी. एम. बोंगाणे आणि सुरेश वाघचौरे यांनी भामट्याचा शोध सुरू केला.
हा भामटा पोलिसांना समर्थनगर भागात दिसल्यानंतर त्याला पकडून क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात या तोतयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत त्याने अशाप्रकारे किती लोकांना फसवले याचा तपास सुरू आहे.