औरंगाबाद- शहरातील गुंडागर्दी, अवैध दारू विक्रीच्या तक्रारी कमी झाल्या असल्या तरी, महिला अत्याचार आणि जमिनीचे वाद या तक्रारींचे प्रमाण 70 टक्क्यांहून अधिक आहे, असे मत औरंगाबादचे सिंघम पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. बुधवारी दिव्य मराठीला भेट देऊन त्यांनी मनमोकळा संवाद साधला. शहरात रूजू झाल्यापासूनचा चार महिन्याचा अनुभव त्यांनी थोडक्यात सांगितला.
काही धाडसी निर्णय घेतले
अमितेश कुमार म्हणाले, 'पब्लीक इंट्रेस लक्षात घेता सुरूवातीच्या काळातच काही धाडसी निर्णय घ्यावे लागले, वाहतूकीची कोंडी करणा-या काळीपिवळी, अवजड मालवाहू वाहने, ट्रॅव्हल्स अशा वाहनांवर बंधने घालण्यात आली. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. या बाबींचा चांगला परिणाम दिसतो. त्यामुळे रस्त्यावरील बेशिस्तीला लगामही लागत आहे.
लोकांचा सकारात्मक प्रतिसाद
'औरंगाबादसोबत माझे पूर्वीपासूनचे नाते आहे. येथे तडकाफडकी केलेल्या काही कारवायांनंतर लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. कॉमनमॅन आणि शहरातील युवक शिस्तीसाठी मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहेत.' असेही ते म्हणाले.
गुंडागर्दी कमी करण्याला प्राधान्य
'शहरातील गुंडागर्दी कमी करण्याला मी प्राधान्य दिले. त्यामुळे रेकॉर्डवर असलेल्या गुंडांची दादागीरी कमी झाली. एखाद्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला तरी आम्ही कायद्याला महत्त्व देतो. जो कायद्याशी खेळेल कायदा त्याच्याशी खेळतो.' असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीसाठी या सोयी हव्या
शहरातील वाहतूकीसंदर्भात ते म्हणाले, ' फोर व्हिलरचे शोरूम असेल, तर नवीन गाड्या रस्त्यावर विक्रीसाठी लावल्या जातात. साधी चहाची टपरी असली, तरी खुर्च्या रस्त्यात टाकल्या जातात. याचा थेट परिणाम वाहतूकीवर होतो आणि पोलिसांना दोष दिला जातो. त्यामुळे विमानतळापासून बाबा पेट्रोलपंप पर्यंतचा सर्व रस्ता मोकळा करायचा आहे. जेणेकरुन एखादा विदेशी पर्यटक येथे आला, तर शहराविषयी त्याचे वाईट मत होऊ नये.' असेही त्यांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो आणि अमितेश कुमार यांचे छंद..