आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Commissioner Amitesh Kumar, Special IG Vishwas Nangare Patil Conversation With Reporters

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकहो, निश्चिंत राहा, 5 मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचतील, आयुक्तांची जनतेला ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वार्तालाप करताना पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील)
औरंगाबाद- नवीन पोलिस अधिकारी दाखल झाला की धडाकेबाज कारवाई सुरू होते अन् काही दिवसांत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतात. असाच प्रकार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याबाबतीत तर होणार नाही, असा प्रश्न सामान्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनाही पडला आहे. परंतु ही कारवाई देखाव्यासाठी किंवा इमेज मेकिंगसाठी नाही. हाती घेतलेल्या सर्व कारवाया अशाच सुरू राहतील अन् येत्या काही दिवसांत आणखी काही कारवाया हाती घेतल्या जातील. अवघ्या पाच मिनिटांत पोलिस घटनास्थळी कसे पोहोचतील यासाठी नियोजन सुरू असून प्रत्यक्षातही तसेच होईल, अशा विश्वास पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केला.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही ग्रामीण भागात आदर्श पोलिसिंग करण्याचा विश्वास व्यक्त केला. व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, प्रमोद माने, बाबा गाडे, सुनील वाघमारे उपस्थित होते. प्रास्ताविक आभार प्रदर्शन डॉ. अनिल फळे यांनी केले. हा चोर-शिपायाचा खेळ आहे. वारंवार कारवाई करावी लागते. वाहतूक व्यवस्था, अवैध दारू विक्री यासाठी हाती घेतलेली मोहीम यापुढे कदापि थांबणार नाही. याशिवाय कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी काही कारवाया हाती घेतल्या जाणार आहेत. सध्या मुख्य रस्त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून तेथे शिस्त लागली की नंतर आम्ही शहरात प्रवेश करू, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नागरिकांना सेवा देण्यासाठीच आम्हाला पगार मिळतो. त्यामुळे पगाराचे काम आम्ही करणारच, अशा शब्दांत त्यांनी पुढील कारवायांचे संकेत दिले.
दंडुका हाती घ्यावा लागतो हे दुर्दैव : कायदासर्वांसाठी आहे, नागरिकशास्त्रात अनेकांनी तो शिकलाही आहे. परंतु कायदा पाळला जात नाही. कायदा पाळा हे सांगण्यासाठी पोलिसांना दंडुका हाती घ्यावा लागतो हे दुर्दैव असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, ट्रिपल सीट प्रवास या गोष्टी घातक असतात. पण त्यासाठीही पोलिसांना सक्ती करावी लागते. यासाठी विद्यार्थ्यांना आधीच शिक्षण देण्याची गरज आहे. दादा, मामा अशा नंबर प्लेट लावल्या जातात. त्यांची यादी आम्ही तयार करत असून त्यानंतर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल.
तक्रारकर्त्याला दुसऱ्या दिवशी फोन केला जाईल
तक्रारकर्त्यांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नाही. पैसेही मागितले जातात; परंतु आता ग्रामीण भागात तक्रारकर्त्यांचे मोबाइल नंबर घेणे सुरू केले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या वतीने नियंत्रण कक्षातून तक्रारकर्त्याला फोन जाईल. त्याला वागणूक कशी मिळाली, पैसे मागितले गेले का, याची विचारणा होईल. चांगली वागणूक देणाऱ्या पोलिसाला बक्षीस, तर देणाऱ्यावर कारवाई नंतर होईल, असे नांगरे पाटील म्हणाले.
'त्या' घटनेने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली
२६-११च्या मुंबई हल्ल्यावरील घटनेनंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. ताज हॉटेलवर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती आधी मिळाली होती. त्यामुळे आम्ही या हॉटेलची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर घटनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अन्य गोष्टींचा वापर केला. यात आमचे अधिकारी, कर्मचारी शहीद झाले, तर काही जण आमच्या डोळ्यांसमोर लढत राहिले. माझ्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी घडल्या. आधीचा विश्वास आणि या घटनेनंतरचा विश्वास यात बराच फरक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिंगल लाइन पार्किंगला मान्यता
शहरात पार्किंगची अडचण आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर एका बाजूला सिंगल लाइन पार्किंगला मान्यता देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी महानगरपालिकेकडून रेखांकन करण्याची गरज आहे. रस्त्याच्या एका बाजूला मोटारी उभ्या राहू शकतील. त्यामुळे पार्किंगची अडचण संपेल तसेच वाहतुकीलाही अडथळा येणार नाही.
पुढील स्लाइजवर क्लिक करून वाचा, दबाव आहे, पण हे बिहार नाही...नागरिकांचा दबाव गट असावा...