आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Commissioner Amitesha Kumara Divyamarathi Office Visited

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळ ते महावीर चौक रस्ता स्मार्ट करण्याची मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी अतिक्रमण हटाव मोहीम, काळीपिवळीवरील बंदी आणि गुंड, भूखंड माफियांवरील कारवाईमुळे औरंगाबादकरांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी (८ सप्टेंबर) "दिव्य मराठी'ला भेट दिली. संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पुढील काळात पोलिस प्रशासन नेमक्या कोणत्या दिशेने पावले टाकणार, याचीही माहिती दिली. स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट होण्याची शक्यता असलेल्या औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळ ते महावीर चौक हा प्रचंड वर्दळीचा रस्ता स्मार्ट करण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चार महिन्यांपूर्वी अमितेशकुमार यांनी कार्यभार स्वीकारला. या अल्पकाळातच त्यांनी ठसा उमटवणारे काही निर्णय घेतले. आणि या निर्णयांच्या अंमलबजावणीवर ठामही राहिले. त्यामुळे त्यांचे नवीन निर्णय कोणते हे जाणून घेण्याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. त्यांना याबाबत छेडले असता ते म्हणाले, एक दिवस मी असाच शहरातून फेरफटका मारत असताना असे लक्षात आले की, विमानतळ ते महावीर चौक रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणे आहेत. पगारिया ऑटो, सतीश मोटर्सची वाहने रस्त्यावर उभी असतात. जागोजागी टपऱ्या थाटल्या आहेत. खड्डे तर प्रचंड आहेत. हे पाहून मी खूपच अस्वस्थ झालो. आता आपण स्मार्ट सिटीच्या गोष्टी करतो. पण कुणी परदेशी उद्योजक विमानतळावरून वाळूजकडे निघाला तर त्याच्या मनात शहराविषयी काय प्रतिमा निर्माण होईल, असा विचार माझ्या मनात आला. हा रस्ता स्मार्ट करण्याची मोहीम एक-दोन दिवसांतच सुरू होणार आहे.
घाणेकरांची वकिली सनद रद्द करण्याचा प्रस्ताव
आैरंगाबाद | पक्षकाराचाच वापर गुन्हेगारी कृत्यासाठी केल्याबद्दल अॅड. नीलेश घाणेकरांची वकिली व्यवसायाची सनद रद्द करण्याचा विनंतीवजा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडे पाठवला आहे. घाणेकरांच्या कारवर मे २०१५ रोजी रात्री ११.३० वाजता बीड बायपास परिसरात गोळीबार झाला. उपरोक्त प्रकरणात घाणेकरांनी आपल्या कनिष्ठ महिला वकिलाविरुद्ध फिर्याद दिली होती. या संदर्भात अमितेशकुमार म्हणाले की, माहिती मिळताच मी घटनास्थळावर पोहोचलो. त्याच वेळी हा गोळीबार म्हणजे घाणेकरांची वकिली सनद रद्द करण्याचा प्रस्ताव बनाव असल्याचे माझ्या लक्षात आले. मला खरे काय ते सांगून टाक, असे मी त्याला त्याचवेळी बजावले होते. तपासात माझे निरीक्षण खरे असल्याचे समोर आले. त्याने त्याच्या पक्षकारांचा गोळीबारासाठी वापर केला होता. हा वकिली व्यवसायाचा गंभीर गैरवापर आहे. त्यामुळे भारतीय वकिली कायदा सेक्शन ३५ नुसार घाणेकरची सनद रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.

सहा महिन्यांत निर्णय शक्य : एखाद्यावकिलाने बेकायदेशीर कृत्य केल्यास त्याविरोधात बार कौन्सिल अथवा एखाद्या सदस्याकडे तक्रार करता येते. त्यावर सहा महिन्यांत निर्णय घेणे शक्य असते. तक्रारीच्या अनुषंगाने बार कौन्सिल एकसदस्यीय समिती नेमून सुनावणी घेते. तक्रारीत तथ्य आढळल्यास द्विसदस्यीय समितीसमोर प्रकरण ठेवले जाते, असे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. वसंतराव साळुंके यांनी सांगितले. यात वकिलाची सनद दोन वर्षे ते कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद असल्याचेही ते म्हणाले.