आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षकाच्या जाचाला कंटाळून पोलिस नाईकाची गोळी झाडून आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिस मुख्यालयातील नाईक रमेश लक्ष्मणप्रसाद शुक्ला (59) यांनी बुधवारी सकाळी 11.40 च्या सुमारास गोळी झाडून आत्महत्या केली. घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. राखीव दलाचे निरीक्षक प्रकाश पाठक यांच्या जाचाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप शुक्ला यांच्या मुलांनी केला आहे.
शुक्ला जानेवारी 2014 मध्ये निवृत्त होणार होते. सैन्यातून त्यांनी कारकीर्द सुरू केली. 1989 मध्ये निवृत्त झाल्यानंतर जालना येथे पोलिस दलात त्यांची भरती झाली. 1995 मध्ये ते औरंगाबाद ग्रामीणमध्ये बदलून आले. 2008 मध्ये आयुक्तालयात त्यांची बदली झाली. दरम्यान, रक्तदाबाच्या त्रासामुळे 1 एप्रिल ते 19 जून 2013 या काळात ते आजारी रजेवर होते. 20 जूनला ते कामावर हजर झाले. बळीराम पाटील शाळेजवळ प्रतापगड कॉलनीत शुक्ला राहत होते.
घाटीतील तपासणीनंतर कैद्यांना हर्सूल कारागृहात परत नेण्याची जबाबदारी शुक्ला, सहायक उपनिरीक्षक शेख मन्सूर, रमेश देशमुख व अशोक गायकवाड यांच्यावर होती. दोन कैद्यांना घेऊन तीन पोलिस घाटीत आले. ऐनवेळी ड्यूटी लागल्याने शुक्ला थेट घाटीत पोहोचले आणि गाडीचा चालक शेख नासेर यांच्याकडे कैदी व सहका-यांबाबत विचारणा केली. त्यांचा शोध घेऊन येतो, असे म्हणत ते गाडीच्या पाठीमागे गेले. काही कळण्याच्या आतच त्यांनी स्वत:जवळील एसएलआरने (सेल्फ लोडिंग रायफल) हनुवटीवर गोळी झाडून घेतली.


ओपीडीच्या बाहेरून अचाक भलामोठा आवाज आला आणि लोक सैरावैरा धावत सुटले. बॉम्बस्फोट झाला, छत कोसळले, गाडीचे टायर फुटले अशा अफवा पसरल्या. नेमके कारण कोणालाच कळत नव्हते. गाडीच्या मागील बाजूस बघितले असता शुक्ला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी झाडून घेतलेली गोळी हनुवटी व डोक्यातून आरपार निघत ओपीडीच्या छतामध्ये जाऊन अडकली होती. शुक्ला यांच्या एसएलआर बंदुकीत दहा काडतुसे होती. शेख व इतरांनी त्यांना घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रक रणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पोलिस आयुक्त घटनास्थळी
शुक्ला यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त सोमनाथ घार्गे आणि
डॉ. जय जाधव घटनास्थळी गेले. घटनास्थळाचा पंचनामा करून बंदूक आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.


कायदेशीर कारवाई करू
आयुक्त संजयकुमार घटनास्थळी आले तेव्हा शुक्ला यांचे चिरंजीव नीलेश, योगेश आणि अनिकेत यांनी वडिलांच्या मृत्यूला पोलिस निरीक्षक प्रकाश पाठक जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. लेखी अर्ज करा, त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी त्यांना दिले.
ओपीडीसमोरून पाठक पळाले
बातमी कळताच निरीक्षक प्रकाश पाठक घटनास्थळी पोहोचले. बघ्याची गर्दी वाढताच त्यांनी ओपीडीतून पळ काढल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
नेहमी गैरहजर राहत होते
शुक्ला नेहमी गैरहजर राहत होते. त्यामुळे अनेकदा त्यांना वेतन मिळत नव्हते. त्यांचा छळ करण्याचा प्रश्नच नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांना स्कॉटिंगची ड्यूटी दिली होती. आज कैद्यांची तपासणी करून त्यांना परत कारागृहात नेऊन सोडणा-या पथकात ते सहभागी होते.
प्रकाश पाठक, पोलिस निरीक्षक, मुख्यालय.