आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपअभियंत्याला कारने चिरडण्याचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भांडणाची पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघालेले उपअभियंता एकनाथ विश्वनाथ शेळके यांना रिपब्लिकन बहुजन फोर्सचा अध्यक्ष मुकुंद शेषराव दाभाडे याने कारची धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:हून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झालेल्या दाभाडे व त्याच्या दोघा नातलगांनी पोलिस ठाण्यात रात्रभर धुडगूस घातला. याप्रकरणी दाभाडेसह त्याचा भाऊ आणि पुतण्यास अटक केली आहे. न्यायालयाने तिघांचीही रवानगी हसरूल कारागृहात केली आहे.

सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांनी सांगितले की, चिकलठाणा येथील धूत डेव्हलपर्समध्ये स्थापत्य उपअभियंता असलेले एकनाथ विश्वनाथ शेळके यांचा चौधरी कॉलनीत प्लॉट आहे. या प्लॉटवर घराचे बांधकाम सुरू आहे. याच परिसरात राहणारा रिपब्लिकन बहुजन फोर्सचा अध्यक्ष मुकुंद दाभाडे याचा भाऊ शांतीलाल हा नेहमी शेळके यांच्या प्लॉटवर कार (एमएच 21-सी 1909) उभी करीत होता. कारचे साहित्य चोरीला कसे काय गेले, अशी उलट विचारणा तो शेळके यांच्याकडे करायचे. याच कारणावरून मंगळवारी रात्री शेळके आणि दाभाडे यांच्यात वाद झाला. या वादानंतर शेळके पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाले होते. या वेळी दाभाडेने शेळके यांना कारने उडवले व तेथून पसार झाला. यानंतर दाभाडे बंधू थेट पोलिस ठाण्यात दाखल झाले. शांतीलालच्या पत्नीवर शेळकेने प्राणघातक हल्ला केला, अशी तक्रार नोंदवून घ्यावी, असा पोलिसांवर दबाव आणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान शेळकेही पोलिस ठाण्यात पोहोचले. शेळके घडलेली हकीगत पोलिसांना सांगत असतानाच दाभाडेने जमादार डी. एस. आरके यांना मारहाण केली. ठाणे अंमलदार दिलीप बाळकृष्ण जाधव आणि अधिकार्‍यांना शिवीगाळ केली.