आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद / गंगापूर- कुटुंबीयांसह नेवासा येथे लग्नसमारंभासाठी गेलेले पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल राजेश जिरे यांचा गोदावरी नदीच्या कठड्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला. जिरे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) पथकात हिमाचल प्रदेश येथे प्रशिक्षण घेतले होते.
राजेश जिरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते. ते 1 डिसेंबर रोजी नेवासा येथून खासगी वाहनाने कायगाव येथील त्यांच्या नातेवाइकांकडे जेवणासाठी रमेश छोटूराम कुंढारे, जिरे यांचे मामा यांच्यासोबत निघाले. परंतु त्यांच्या वाहनाच्या चालकास प्रवरासंगमनजीकच्या हॉटेल पंचशील येथे जेवण करायचे असल्यामुळे तो तेथे थांबला. जिरे त्यांच्या मामासह रात्री साडेआठच्या सुमारास जुने कायगावकडे गोदावरीच्या पुलावरून निघाले. मात्र अंधारात जिरे यांचा तोल गेल्याने ते कठड्यावरून खाली कोसळले. खाली पाणी नसल्यामुळे जमिनीवर डोक्याला जबर मार लागला. परिणामी गंभीर जखमी झालेल्या जिरे यांचा मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास जिरे यांच्या पार्थिवावर बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन भावंडे, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
जुने कायगाव येथील त्यांचे नातेवाईक रामभाऊ लक्ष्मण भुंगासे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बी. आर. उदे व बी.बी. दुधे हे करीत आहे.