आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस हवालदार थापा मुख्य सूत्रधार, एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा लुटल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चलनातून बंद झालेल्या एक कोटी रुपयांच्या नोटा लुटल्या गेल्या आहेत. सेंट्रल नाका परिसरात २१ फेब्रुवारी रोजी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात पोलिस मुख्यालयातील हवालदार वीरबहादूर गुरुंग (थापा) याचाही समावेश आहे. 

शेख फजल शेख युसूफ (रा. किराडपुरा), जमीर खान जलील खान (रा. नारेगाव), शेख शहजाद ऊर्फ सद्दाम शेख रियान (रा. किराडपुरा) आणि साजीद अब्दुल ऊर्फ अंकल कय्युम (रा. नारेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नारेगावातील माफिया सलीम स्टेपनीचादेखील यात समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या आरोपींना चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणी राजेश हरगोविंदजी ठक्कर (५५ रा. एन सिडको) यांनी सहा दिवसांनंतर जिन्सी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी राजेश ठक्कर यांचे मित्र हितेश पुजारा सिडको एन भागात कुरिअर सेवा पुरवतात. 

२० फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते पाचच्या सुमारास ठक्कर यांना पुजाराने फोन केला. त्या वेळी पुजाराने आपल्याकडे एक कोटी रुपये (जुन्या चलनातील हजार, पाचशेच्या नोटा) आहेत. या नोटा कोणी नवीन चलनात बदलून देत असेल तर सांगा असे म्हटले. त्यावर दोन लाख रुपये कमिशन दिले जाईल. रिझर्व्ह बँकेकडून जुन्या नोटा ३१ मार्चपर्यंत बदलून मिळणार आहेत. पण सर्व प्रक्रिया करून पैसे मिळणे अधिक किचकट असल्याचेही पुजाराने सांगितले होते. ठक्कर यांनी त्यांचे मित्र सागर सरवैये यांच्याशी २१ फेब्रुवारीला यासंदर्भात चर्चा केली. त्याच दिवशी सरवैये सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास मोंढ्यातील ठक्कर यांच्या दुकानात आले. सरवैयेने आपला मित्र योगेश शेट्टे नोटा बदलून देण्याचे काम करत असल्याचे ठक्कर यांना सांगितले. त्यामुळे शेट्टेलाही दुकानावर बोलावून घेण्यात आले. तिघांच्या चर्चेनंतर शेट्टेने त्याचे आझाद चौकातील साथीदार पाटील नोटा बदलून देतील. त्यामुळे आजच पैसे घेऊन या असे सांगितले. म्हणून ठक्कर यांनी नोटा बदलून घेण्यासाठी पुजारा यांच्याकडून हजार पाचशेच्या (जुन्या चलनी नोटा) नोटा मागवून घेतल्या. 

रात्री पुजारा यांचा मेव्हणा राजेश कक्कड प्लास्टिकच्या गोणीत एक कोटी घेऊन ठक्कर यांच्या दुकानावर गेला. ठक्कर आणि सरवैये दुचाकीवर पैशांनी भरलेली गोणी घेऊन शेट्टेने सांगितल्यानुसार आझाद चौकात गेले. त्याठिकाणी शेट्टे त्याचे साथीदार फजल आणि सद्दाम असे तिघे भेटले. पाटीलचे घर बायजीपुरा परिसरातील सेंट्रल नाका येथे असल्याने पैसे घेऊन तेथे जाण्यास शेट्टेने सांगितले. त्यांचे काम पाहणारा रफिकभाई तेथे भेटेल तो पैसे बदलून देईल. असे म्हटल्यावर दोघेही सेंट्रल नाक्यावर गेले. 

तेथे भेटलेल्या रफिकभाईने दोघांना पैशांच्या गोणीसह कारमध्ये (एमएच-२१-व्ही-७८०२) बसवले. मात्र, सद्दाम आणि फजल दुचाकीने पोहोचले. पाटीलचे घर नजीकच आहे. तेव्हा पैशांची गोणी कारमध्येच ठेवा आणि त्यांच्या घरी पायी चला असे त्यांनी सांगितले. कारमध्ये पैसे ठेवून उतरण्यास ठक्कर तयार नव्हते. म्हणून फजल, सद्दाम आणि शेट्टे यांनी ठक्कर सरवैये यांना जिवे मारण्याची धमकी दिली. कारमधून बळजबरी धक्का देऊन मारहाण केली. यानंतर पैशांची गोणी घेऊन कारसह पाच जणांनी पळ काढला. 

यापूर्वीही थापाने गुन्हेगार पळवून लावले होते...
जमीरने व्यापाऱ्याची रक्कम नारेगावातील सलीम पटेल ऊर्फ स्टेफनीला दिली. एवढी रक्कम बदलून देण्याची क्षमता नसल्याने स्टेफनीने जमादार थापाला तेथे बोलावून घेतले. घटनेची सविस्तर माहिती दिल्यानंतर त्याने नोटा बदलून देण्यासाठी तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. चार ते पाच दिवस हे पैसे थापाकडेच होते,असे तपासात समोर आले. विशेष म्हणजे सुमारे २५ वर्षापूर्वी मुंबईतील कुख्यात डॉन दाऊदचा जवळचा माया डोळसची गँग हर्सूल कारागृहात होती. त्यांना मुंबईतील कोर्टात हजर करण्यासाठी नेताना हे आरोपी रस्त्यात पळून गेले होते. या वेळी त्यांना घेऊन जाण्याची जिम्मेदारी हवालदार थापा यांना देण्यात आली होती. या प्रकरणात थापावर ठपका ठेवून निलंबित केले होते. तरीही दोन वर्षांपूर्वी परिमंडळ दोनच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या विशेष पथकातही थापाचा समावेश होता. तक्रार आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी त्याची बदली केली होती. 

चकलांबा पोलिसांनी पकडले...
२४ फेब्रुवारी रोजी रात्री शेवगावहून गेवराईकडे जाताना चकलांबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी जमीर खानला पकडले. त्याच्याकडून साडेनऊ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. हे पैसे आपलेच असावे, आरोपींची नावे ही सारखीच होती, असे वाटल्यानंतर राजेश ठक्कर यांनी पुन्हा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. 

११ पर्यंत पोलिस कोठडी
आरोपींना गुन्हे शाखेेने अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता साथीदार योगेश शेट्टे यास अटक करणे आहे. ९४ लाख पोलिसांनी जप्त केले असून उर्वरित लाख हस्तगत करणे आहे. आरोपींनी गुन्हा करतेवेळी काही कट रचला होता काय, तो कोणी रचला यात कोण कोण होते याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सहायक सरकारी वकील एम. ए. गंडले यांनी केली. न्यायालयाने चारही आरोपीस ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या... 
सोमवारी ठक्कर यांनी जिन्सी ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, गुन्हे शाखा निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल वाघ, जमादार नितीन मोरे, मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, संतोष सूर्यवंशी, भाऊलाल चव्हाण यांनी चौघांना नारेगावातून अटक केली. योगेश शेट्टे याला ताब्यात घेतल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. 

या प्रश्नांचे उत्तर मिळणे आवश्यक 
- आठ नोव्हेंबर रोजी चलन बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन महिने नोटा बदलून मिळत होत्या. त्यावेळी पुजारा यांनी नोटा का बदलल्या नाही. त्यांच्याकडे आलेला एक कोटी रुपयांचा नेमका स्रोत काय. 
- अटक करण्यात आलेल्या आरोपी आणि फरार असलेला योगेश शेट्टे यांनी नोटा बदलून देतो, असे आमिष दाखवले होते. या नोटा ते कोठून बदलणार होते. 
- नोटा बदलून देतो असे दाखवले होते व्यापाऱ्याला आमिष 
- पाच जणांना अटक, एक फरार, गुन्हे शाखेची कारवाई, पोलिस हवालदार मास्टरमाइंड असल्याचे तपासात निष्पन्न 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...