औरंगाबाद - विनंती बदली ही केवळ आणि केवळ विनंतीनुसारच होण्याचा सुखद धक्का औरंगाबाद आयुक्तालयाच्या कार्यकक्षेतील पोलिस कर्मचार्यांना रविवारी बसला. कोणत्याही वशिल्याशिवाय आणि आर्थिक भुर्दंडाशिवाय हवे ते पोलिस ठाणे मिळाल्याने ५०६ पोलिस काॅन्स्टेबल आणि त्यांचे कुटुंबीय आनंदात आहेत.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त म्हणून नुकतेच रुजू झालेल्या अमितेशकुमार यांनी अत्यंत पारदर्शकपणे शनिवारी दुपारनंतर ही बदली प्रक्रिया सुरू केली. ‘बताओ तुम्हे कौनसा पुलिस थाना चाहिये' अशी विचारणा खुद्द आयुक्तांनीच केल्यावर अनेकांना
आपण स्वप्नात आहोत की काय असे वाटले. या आधी असा अनुभव त्यांनी कधी घेतला नव्हता. अपेक्षित पोलिस ठाणे हवे असेल तर या कर्मचार्यांना आधी मर्जी राखलेल्या वरिष्ठ अधिकार्यांचा वशिला लावावा लागायचा.
पोलिस ठाण्याच्या महत्त्वानुसार आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागायचा. अमितेश कुमारांनी मात्र, ही प्रथा मोडीत काढत कर्मचार्यांची इच्छा आणि गरजेनुसार त्यांची तत्काळ बदली केली. पाच वर्षांपासून एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत कर्मचार्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. मंगळवारपासून ते नव्या ठाण्यात रुजू होतील. या आधी अमरावती आणि औरंगाबाद ग्रामीणमध्ये कुमार यांनी हा प्रयोग केला आहे. त्याचे सकारात्मक परिणामही समोर आले आहेत. या बदली प्रक्रियेत उपायुक्त संदीप आटुळे, अरविंद चावरिया आणि वसंत परदेशी यांचाही सहभाग होता.
कुटुंबप्रमुख म्हणून..
पोलिस यंत्रणेचा कुटुंबप्रमुख असल्याने प्रत्येकाच्या अडचणी आणि सोई लक्षात घेणे माझे कर्तव्य आहे. कर्मचार्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या विनंतीनुसार बदल्या केल्या आहेत. मनासारख्या ठिकाणी काम करण्याची सोय झाल्यामुळे कर्मचार्यांमध्ये सकारात्मक बदल होतील असे वाटते. तसा पूर्वानुभवदेखील आहे. -अमितेशकुमार, पोलिस आयुक्त
सर्वाधिक मागणी वाळूजला
पोलिस कर्मचार्यांकडून सर्वाधिक मागणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बदलीसाठी करण्यात येते. दुसर्या क्रमांकावर असते क्रांती चौक पोलिस ठाणे. त्यानंतर जिन्सी आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचा नंबर लागतो, असे एका अनुभवी पोलिस कर्मचार्याने सांगितले. यावेळी मात्र, संबंधित पोलिस ठाणे का हवे, हे विचारण्यात आल्याने कर्मचार्यांच्या खर्या गरजांनुसार बदल्या झाल्याचेही त्याने नमूद केले.