आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगारखाना गल्लीत वृद्धेचे नऊ तोळ्यांचे दागिने लांबवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जैन मंदिरामध्ये दर्शनासाठी निघालेल्या वृद्धेचे दुचाकीवर आलेल्या तोतया पोलिसांनी 9 तोळ्यांचे दागिने लांबवले. ही घटना सकाळी सात वाजता नगारखाना गल्लीत घडली. वृद्धा ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता त्यांची फिर्याद घेण्यास विलंब तर लागलाच, परंतु पोलिस नोकर भरतीसाठी गेल्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी सिटी चौक ठाण्यात एकही पोलिस शिल्लक नव्हता. नगारखाना गल्लीतील शोभा माणिकचंद बडजाते (61) या नेहमीप्रमाणे जैन मंदिरात दर्शनासाठी निघाल्या होत्या.
दरम्यान दोन भामटे दुचाकीवर त्यांच्याजवळ आले. त्यांनी वृद्धेला थांबवले. ‘तुम्ही एवढे सोन्याचे दागिने घालून कुठे जात आहात, सर्व दागिने काढून आमच्याजवळ द्या असे म्हणाले.’ वृद्धेने त्यांना नकार दिला. पण काही वेळ वृद्धेला काहीच कळले नाही. त्यांनी अंगावरील दागिने काढून दोघांना दिले.
सर्व दागिने त्यांनी रुमालात बांधून ते पुन्हा वृद्धेच्या हातात दिले. घाबरलेली वृद्धा तातडीने घरी परतली आणि त्यांनी सुनेला घडलेला प्रकार सांगितला. रुमालात बांधलेले सोने उघडून पाहिले तेव्हा रुमालात दोन बनावट बांगड्या आणि दगड निघाले. दोघांपैकी एकाने रुमालाने तोंड बांधलेले होते. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत पांचाळ करत आहेत.