आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Inspactor Son Attack On Constable In Aurangabad

सहायक फौजदाराच्या मुलाने क्षुल्लक कारणावरून हवालदाराला भोसकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हडको येथील पोलिस कॉलनीत राहणार्‍या सहायक फौजदाराच्या मुलाने धारदार चाकूने पोलिस हवालदार अशोक पिराजी झिने (50) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. मंगळवारी (17 सप्टेंबर) रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. झिने यांना घाटीच्या अतिदक्षता विभागात दाखल केले असून संदीप पल्लाड (24) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 24 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सिडको पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार हरिभाऊ पल्लाड आणि एमआयडीसी वाळूज ठाण्याचे हवालदार अशोक झिने हे दोन्ही परिवार शेजारी राहतात. त्यांच्यात पूर्वीपासूनच कुरबूर होती, किरकोळ कारणांवरून दोन्ही परिवारात नेहमी भांडणे होत असे. 17 सप्टेंबरला रात्री झिने यांना त्यांची टीव्हीएस स्कूटी आणि एक मोटारसायकल जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळल्या. दोन्ही वाहने पल्लाड यांचा मुलगा संदीप यानेच पाडल्याचा त्यांनी आरोप केला. दोन्ही परिवारांमध्ये याच कारणांवरून रात्री जोरदार भांडण झाले. संदीपचे वडील पल्लाड त्या वेळी सिडको ठाण्यात ड्यूटीवर होते. संदीपने रागाच्या भरात झिनेंना मारहाण केली. नंतर त्याने घरातील किचनमधील कांदा कापण्याचा चाकू आणून पोलिस हवालदार झिने यांच्या पोटावर सपासप वार केले. त्यांना शेजार्‍यांनी घाटीत दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संदीप विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक विशाल टकले पुढील तपास करत आहेत.