आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा हवी असेल, तर मूळ गावी परत जा, पोलिस निरीक्षकांचा अजब सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- औद्योगिक परिसरातील वसाहतीमध्ये राहणा-या गरोदर बहिणीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीची सोमवारी रात्री उशिरा छेड काढल्याप्रकरणी आरोपीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी बहिणीसह मुलीने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरेंना सांगितला. मात्र, त्यावर आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे टाळून उलट मुलीलाच ह्यतू तुझ्या मूळ गावी परत जा असा अजब सल्ला बहुरे यांनी मुलीला दिला. त्यामुळे पोलिसांच्या सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
समाजातील अनेक अन्याय व अत्याचारग्रस्त महिला संबंधित आरोपींच्या भीतीपोटी व समाजात बदनामी होईल म्हणून कायद्याचे दार ठोठावण्याची हिंमत करत नाहीत. महिलांनी ह्यकायद्याचे हत्यार उपसावेह्ण याकरिता प्रशासकीय स्तरावर विविध शिबिर, कार्यशाळा आदींद्वारा कायदा साक्षरतेचे धडे शिकवले जातात. मात्र, हे सर्व औपचारिक असते. प्रत्यक्षात कायद्याकडे धाव घेऊनही गुन्हेगारांना पाठीशी घालत महिलांनाच काढता पाय घेण्याचा सल्ला अधिकारीच देतात. त्यामुळे महिलांनी कायद्याकडे धाव न घेता मुकाट्याने अन्याय सहन करायचा का? असा बोलका प्रश्न संबंधित अन्यायग्रस्त अल्पवयीन मुलीच्या बहिणीने उपस्थित केला आहे.
पोलिसांत घेतली धाव
सदरील प्रकार सोमवारी रात्री उशिरा घडल्यामुळे मंगळवारी दोघी बहिणी व त्यांच्या परिचित असणारी एक महिला या तिघींनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिस जमादारास सांगून तक्रार नोंदवून घेण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी पीडित मुलीसह तिच्या बहिणीला धीर देत तुमची तक्रार नोंदवून घेऊ व आरोपीला चांगला धडा शिकवू. मात्र, त्यापूर्वी तुम्ही साहेबांची भेट घ्या, असे सांगितले. त्यावर तिघींनी बहुरे यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी उलट मलाच गावी परत जाण्याचा सल्ला दिल्याचे पीडित मुलीने "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

काय आहे प्रकरण
औद्योगिक परिसरात पतीसह राहणारी बहीण गरोदर असल्यामुळे घरकामात मदत करण्यासाठी गावाहून 17 वर्षीय बहिणीस बोलावले. दरम्यान, परिसरात राहणारा एक मुलगा या मुलीची वारंवार छेड काढत होता. सोमवारी (3 नोव्हेंबर) रोजी सदरील मुलगी व तिची बहीण घरी एकटीच असल्याची संधी साधून तो मुलगा वाईट हेतूने घरात घुसला. दरम्यान, आरडाओरड केल्यामुळे त्याने सोबतच्या दोन साथीदारांसह दुचाकीवरून पळ काढला.