आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षकाची पालिकेच्या वाहनचालकास मारहाण; काम बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापालिकेच्या घनकचरा वाहतूक करणाऱ्या वाहनावरील चालक हरिश्चंद्र सोनवणे यांना सेंट्रल नाका येथील वर्कशॉपमध्ये घुसून जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी मारहाण केली. परिणामी वसूरकरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुमारे अडीचशे वाहनचालकांनी बंद पुकारून मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना निवेदन दिले. बकोरियांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. काम बंद आंदोलनामुळे सायंकाळपर्यंत रस्त्यावर २०० टन कचरा पडून होता. मंगळवारीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा वाहनचालकांनी दिला आहे. 

मनपा वाहनचालकांनी बकोरिया यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कचऱ्याचा ट्रक चिश्तिया कॉलनीकडून सेंट्रल नाक्याकडे येत असताना गाडीच्या क्लीनरने वळण घेताना हात दाखवला. तेव्हा पोलिस व्हॅन थोड्या अंतरावर होती. ट्रक वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर मागोमाग पोलिस व्हॅनही अाली. या व्हॅनमध्ये आलेल्या वसूरकरांनी शिवीगाळ करत वाहनचालक हरिश्चंद्र सोनवणे यांना मारहाण करून हातपाय तोडण्याची धमकी दिली. तसेच ताबडतोब पोलिस ठाण्यात येण्याचा निरोपही दिला. या घटनेनंतर मनपाचे लहानमोठे २०० ते २५० कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या चालकांना त्यांचा गुन्हा नसताना पाेलिस अधिकारी मारहाण करू शकतील. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

काहीच चूक नसताना मारहाण
सेव्हन हिल्सकडून येणारी पोलिस व्हॅन लांब होती. मी चिश्तिया कॉलनीकडून येऊन वर्कशॉपमध्ये गाडी लावण्यास गेलो. गाडी वळवताना कट मारला म्हणत वसूरकर यांनी वर्कशॉपमध्ये येऊन शिवीगाळ करून मारहाण केली, असे सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

बेदरकार होता चालक
या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी इतर वाहने ये-जा करतात. अशा स्थितीत कचऱ्याची गाडी बेदरकारपणे चालवत होता. आमच्या व्हॅनवरही ट्रक येत होता. माझ्या चालकाने सावधानता बाळगून गाडी बाजूला केली. त्यामुळे बचावलो. मनपाच्या कर्मचाऱ्याला समजावायला कर्मचारी पाठवला असता त्यालाही त्याने उद्धटपणे उत्तरे दिली. मलाही तसेच बोलला. त्यामुळे हात उचलावा लागला, असे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...