आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षक शिवा ठाकरेंचे घर सील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुन्हे शाखेचे लाचखोर पोलिस निरीक्षक शिवाजी अवधूत ठाकरे यांना खामगाव न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांचे औरंगाबादेतील घर सील करण्यात आले. दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात देण्याची धमकी देऊन साखरखेर्डा येथील शफी नामक व्यक्तीकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सहा फेब्रुवारीला रंगेहाथ अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात अकोला एसीबीने ठाकरे यांचा रायटर भीमा पवार यालाही सहआरोपी केले असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

पैशांचा पाऊस पाडण्याच्या प्रकरणात औरंगाबाद गुन्हे शाखेने बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेतले होते. नंतर त्याला दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात देण्याची तसेच फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणातून सुटका हवी असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी तंबीही दिली होती. तक्रारदाराने दीड महिन्यापूर्वी त्यांना दीड लाख रुपये धनादेशाद्वारे दिले होते. पाच लाख रुपये शेगाव येथे स्वीकारण्याचे ठरले होते. शेगाव-खामगाव रोडवर शुक्रवारी रात्री सापळा रचून पाच लाख रुपये घेताना ठाकरे यांना जेरबंद केले. रात्री उशिरा शेगाव पोलिस ठाण्यात ठाकरे आणि त्यांचा रायटर भीमा पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाकरे यांना वेळोवेळी गुप्त माहिती देणा-या एका व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.