आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका राजकीय गटाकडून शहर अस्थिरतेचा प्रयत्न, गेल्या 18 दिवसांत दगडफेकीच्या सहा घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या 18 दिवसांत शहराच्या विविध भागांत दगडफेक, वादाच्या सहा घटना घडल्या. त्यामुळे गेली दहा वर्षे कायम असलेली शांतता भंग पावत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षाच्या एका गटाकडून शहराला अस्थिर, तणावपूर्ण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. वैयक्तिक वादाला जातीय, धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होत असल्याचे पोलिस गुप्तचर विभागाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. या पक्षाचे तसेच तणाव निर्माण करणाऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, ही उपद्व्यापी, कारस्थानी दंगलखोर प्रवृत्तीची मंडळी आणि त्यांचे समर्थक आमच्या रडारवर आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी चिंता करू नका, कायदा-सुव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्यांची जागा पोलिस कोठडीतच असेल, असे स्पष्ट केले आहे.
1988, 92, 93 च्या दंगलीत होरपळलेले औरंगाबाद शहर संवेदनशील झाले. 1999 च्या दंगलीनंतर किरकोळ घटना झाल्या तरी 2004 नंतर हे शहर कमालीचे शांत दिसत होते. संवेदनशील हा शब्दप्रयोगही वापरणे काहीसे बंद झाले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम या हैदराबादस्थित पक्षाच्या यशानंतर शहर तेढ वाढण्याच्या दिशेने जात असल्याचे नागरिकांना वाटत आहे. त्यामागे नेमके काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ह्यदिव्य मराठीह्णने केला तेव्हा गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याने सांिगतले की, एका राजकीय पक्षातील मोठा गट हिंसक घटनेची पायाभरणी करत आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीपूर्वी शहर जातीय वणव्यात होरपळू शकते. तशी शक्यता पोलिस आयुक्तांकडे व्यक्तही करण्यात आली आहे. तेव्हा प्रत्येक निवडणुकीनंतर सर्वच शहरांत असे प्रकार घडत असतात. औरंगाबादेतील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे, असे त्यांना आयुक्तांनी सांगितले.
पालिका निवडणुकीची धास्ती
एमआयएमने औरंगाबाद मध्य मतदारसंघात यश मिळवले, तर पूर्वमध्ये अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे या पक्षाच्या समर्थकांचे मनोधैर्य कमालीचे उंचावले आहे. त्याचाच परिणाम वाद वाढण्यात होत असल्याचे पोलिस दलातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध एमआयएमचा आक्रमक पवित्रा राहिल्यास वाद वाढतील, असाही गुप्तचर विभागाचा होरा आहे.
त्यांचे मनोबल उंचावत आहे
निवडणुकीदरम्यान तसेच निकालानंतर वेळोवेळी दोन गटांत तणाव झाले. मात्र, प्रत्येक वेळी आधी गुन्हा आणि नंतर तपास अशी भूमिका असणाऱ्या पोलिसांनी या वेळी गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ चालवली. तणाव वाढू नये, अशी त्यांची भूमिका असली तरी गुन्हाच दाखल होत नसल्यामुळे मुद्दाम वाद वाढवणाऱ्यांचे मनोबल उंचावत असल्याचे पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.