आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिफ्ट घेणाऱ्यांमध्ये पोलिस नंबर वन, पत्रकारांचा लागतो दुसरा क्रमांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैयक्तिक गिफ्ट खरेदीसाठी ऑनलाइन खरेदीचा पर्याय वापरला जात असून यात कपडे आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा समावेश आहे. तर उद्योजक आणि व्यापारीदेखील मॉल, कंपन्यांशी संपर्क साधून खरेदी करत आहेत.

औरंगाबाद - दिवाळीच्या गिफ्ट बाजारात यंदा १०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे. पोलिस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वाधिक भेटवस्तू दिल्या जातात, तर त्याखालोखाल पत्रकारांचा क्रमांक लागतो, असे दिव्य मराठीने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले असून गिफ्ट देण्यात व्यापाऱ्यांचा पहिला क्रमांक असल्याचे समोर आले आहे. शहरात पोलिस अधिकाऱ्यांचा समाजातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क येतो. व्यापारी, राजकारणी, उद्योजक, डॉक्टर आदींना पोलिसांशी चांगले संबंध असावे असे वाटते. त्यामुळे पोलिसांना येणाऱ्या भेटवस्तूंचे प्रमाण अधिक आहे. पत्रकारांचाही असाच जनसंपर्क असल्यामुळे भेटवस्तू येण्याचे प्रमाण अधिक आहे.

लहान-मोठे सुमारे १५ हजार व्यापारी आहेत. आपले संबंध टिकावेत आणि त्यात अधिक गोडवा यावा यासाठी दिवाळीनिमित्ताने गिफ्टचे वाटप होते. वर्षभर विविध कारणांनिमित्त ज्या लोकांशी काम पडते अशा लोकांना गिफ्ट दिले जाते. याशिवाय उद्योजक, डॉक्टर, बिल्डर त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू मिठाई किंवा ड्रायफ्रूट देतात. यामुळे गिफ्टवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. या दिवाळीत मोबाइल इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या मार्केटमध्ये ४० कोंटींची उलाढाल होईल, अशी माहिती मोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे यांनी दिली. सुक्यामेव्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी आहेत तरीदेखील या मार्केटमध्ये ५० कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते, अशी माहिती तिरुपती ट्रेडर्सचे संचालक गोपाल चांडक यांनी दिली.

महागडेगिफ्ट डॉक्टरांना : सर्वाधिकगिफ्ट पोलिसांना मिळत असले, तरी महागडे गिफ्ट डॉक्टरांना प्रेमापोटी दिले जाते. यात प्रामुख्याने ड्रगिस्ट कंपन्या आणि व्हेंडर लोकांचा समावेश आहे. यानंतर सरकारी खात्यात येणाऱ्या विविध कार्यालयांतील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू मिळतात. यात महसूल, अन्न औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, आरटीओ, रस्ते विकास महामंडळ, पाटबंधारे विभाग, मनपा, वजनमापे, आयकर या खात्यातील लोकांना महागडे गिफ्ट मिळतात. राजकारणी आणि पत्रकारांना सर्वसाधारण, तर पोलिसांमध्ये पदानुसार गिफ्ट दिले जाते.

याप्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात :
मिठाईमध्ये भेसळ असल्याचे अनेकदा निदर्शनास आल्यामुळे अनेक लोक आता ड्रायफ्रूटचा सजवलेला बॉक्स देण्यास पसंती देतात. या बाक्समध्ये शुभेच्छा पत्र, ब्रँडेड पाकीटबंद मिठाई देण्याचा ट्रेंड आहे. याशिवाय मोबाइल, घड्याळ, ट्रॅव्हलिंग बॅग, डिनर सेंट, चांदीचे लक्ष्मीचे चित्र असलेले शिक्के, कॅलेंडर, सोन्याची लक्ष्मीची मूर्ती या वस्तूंना भेटीसाठी प्राधान्य दिले जाते, तर साहित्याची आवड असणाऱ्यांना दिवाळी अंकाची भेट देण्याचाही ट्रेंड आला आहे.
बातम्या आणखी आहेत...