आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीपी यशस्वी यादवांसह 17 पोलिस स्टेशनचे अधिकारी रस्त्यावर, सापडल्या 7 दारूच्या बाटल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा पेट्रोल पंप चौकात पोलिस आयुक्त यशस्वी यादव जातीने हजर होते. - Divya Marathi
बाबा पेट्रोल पंप चौकात पोलिस आयुक्त यशस्वी यादव जातीने हजर होते.
औरंगाबाद- शहरातील वाढत्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी शनिवारी शहरात एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ पुकारले होते. त्यात नवनियुक्त पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासह उपायुक्त राहुल श्रीरामे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले होते. एकाच वेळी शहरातील १७ पोलिस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर, चौकात नाकेबंदी करत वाहनांची तपासणी केली. त्यामुळे सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत चाललेल्या या ऑपरेशनने वर्दळीचे रस्ते दोन तास ठप्प झाले होते. लोकांचे प्रचंड हाल झाले. 
 
सायंकाळी सहाच्या ठोक्याला हे ऑपरेशन सुरू झाले. तेव्हा शहरातील कार्यालये, कंपन्या आणि कोचिंग क्लासेस सुटले होते. अनेक जण खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. घरी परतणारे आणि बाजारात निघालेले हजारो वाहनधारक रस्त्यावर होते. त्याच वेळी जालना रोड, टीव्ही सेंटर, सेंट्रल नाका, संताजी चौक, महानुभाव आश्रम, गोदावरी टी पॉइंट, सूतगिरणी चौक, गजानन मंदिर चौक, जयभवानीनगर, सिडको बसस्थानक, एपीआय कॉर्नर, हर्सूल टी पॉइंट, हडको कॉर्नर, हर्सूल गाव, लेबर कॉलनी, बाबा पेट्रोल पंप चौक, चंपा चौक, कटकट गेट, रोशन गेट, शहागंज, औरंगपुरा, क्रांती चौक, सावरकर चौक आदींसह शहरातील सर्व प्रमुख मार्ग, चौकांमध्ये सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. चौकांमध्ये बॅरिकेड्स लावून पोलिसांनी दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक करणारी वाहने, जड वाहनांची तपासणी, कागदपत्रांची तपासणी केली. 
 
दर आठवड्यात असे ऑपरेशन 
लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना यावी याकरिता दर आठवड्यात कोम्बिंग ऑपरेशन होणार आहे. लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास झाला असला तरी पहिल्या प्रयत्नात पोलिसांना मोठे यश मिळाले. चोरट्या मार्गाने दारू वाहतूक करणारे पकडले गेले. ऑपरेशनमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पथकांना बक्षीस दिले जाणार आहे. कारवाईचा अंतिम अहवाल येण्यास एक दिवस लागेल, असे पोलिस आयुक्त म्हणाले. 
 
वादामुळेही वाहतूक खोळंबली 
चारचाकींची अडवणूक करून तपासणी सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी वादावादीही झाली. परंतु पोलिसांनी तपासणीशिवाय वाहन सोडणारच नाही, असा पवित्रा घेतला होता. त्याचा मोठा फटका जालना रस्ता, हर्सूल, गजानन मंदिर चौक, महानुभाव आश्रम रस्त्यावर बसला. तेथे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. 
 
४५ पथके, कोम्बिंगसाठी २० टीम 
ऑपरेशन ऑल आऊटसाठी सर्व पोलिस ठाण्यांची मिळून ४५ पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात सहा कर्मचारी एक अधिकारी होता. सराईत गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय २० डीबी पथके होती. या पथकांवर अवैध दारू, बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणारे, वाहनचोर, संशयित व्यक्तींना हेरण्याची जबाबदारी होती.
 
आयुक्त म्हणाले: कायदा-सुव्यवस्थेसाठी असे ऑपरेशन आवश्यकच 
 ५०० पेक्षा अधिक संशयितांची चौकशी झाली 
१० ते १२ जणांनाताब्यात घेण्यात आले. 
१५ जणांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई 
 
अवैध दारूच्या ७ बाटल्या जप्त 
हर्सूल पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकाने एका वाहनातून अवैध दारूची वाहतूक करणारे वाहन पकडून सात बाटल्या जप्त केल्या. 
 
मॉलमध्ये तपासणी 
सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास डी मार्ट मॉल, हॉटेल ताजमध्ये तसेच रेल्वेस्टेशन, छावणी परिसरात पोलिस निरीक्षक सुशील जुमडे, अशोक थोरात, प्रकाश म्हस्के, मुश्ताक शेख, अनिल जवळकर, नरेश जामकर आणि श्वान गौरी यांच्या पथकाने तपासणी केली. 
बातम्या आणखी आहेत...