आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्‍न सुरक्षेचा: काचांवर काळ्या फिल्म मिरवणार्‍या 1001 गाड्यांना दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दोन महिन्यांच्या अवकाशानंतर वाहतूक पोलिसांनी आज पुन्हा काळ्या फिल्म लावून दिमाखात मिरवणार्‍या वाहनांवर जम्बो मोहिमेअंतर्गत कारवाई केली. सोमवारी (3 जून) सायंकाळी पाच ते साडेसहा वाजेदरम्यान शहरातील विविध भागांतील 13 पॉइंटवरील 1001 वाहनचालकांवर दंडाचा बडगा उगारत एक लाख रुपये वसूल केले. काळ्या फिल्म हटवण्यासंबंधी उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही बड्या आसामींच्या गाड्यांवर काळय़ा फिल्म दिमाखात मिरवत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने वृत्ताच्या माध्यमातून वारंवार लक्षात आणून दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. काही कालावधीनंतर ही मोहीम थंडावली होती. ती सोमवारपासून पुन्हा जोमाने सुरू झाली.

पोलिस आयुक्तांपासून हवालदारापर्यंत सर्वच तैनात
शहरातील चिकलठाणा, कामगार चौक, सूतगिरणी, शहानूरमियां दर्गा, हसरूल टी पॉइंट, नगर नाका, गुलमंडी, मिलिंद चौक, वरद गणेश मंदिर, महानुभाव आर्शम, महाराणा प्रताप चौक अशा 13 चौकांत ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, अरविंद चावरिया, डॉ. जय जाधव, सहायक पोलिस आयुक्त अजित बोर्‍हाडे, नरेश मेघराजानी, विजय पवार, के. एस. बहुरे यांच्यासह 260 कर्मचार्‍यांचा या कारवाईत समावेश होता. कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी पोलिसांशी हुज्जत घातली. दरम्यान, कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त बोर्‍हाडे यांनी सांगितले.


विशेष पथकाची नजर
काळी फिल्म असलेल्या गाड्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरूच राहील. यासाठी विशेष पथकाची नेमणूकदेखील केली आहे. मोठय़ा कारवायासुद्धा करण्यात येतील. वाहनधारकांनी स्वत:हून गाडीला लावलेल्या काळ्या फिल्म काढून टाकाव्यात.’ अजित बोर्‍हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.


थंडावलेली मोहीम पुन्हा सुरू
दोन महिन्यांपूर्वी शहरातील काळ्या फिल्म असलेल्या चारचाकींवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली होती. त्यामुळे शहरातील काळ्या फिल्मचे प्रमाण कमी झाले होते. फिल्म लावून गाडीत गैरप्रकार चालतात. त्यामुळे फिल्म हटवण्यासंबंधी उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. दिल्लीतील बलात्कारानंतर ही मोहीम तीव्रतेने राबवण्यात आली. थंडावलेली मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली.


या चौकांत मोठी कारवाई
नगर नाका
वरद गणेश मंदिर
बाबा पेट्रोल पंप 150
क्रांती चौक 217
हसरूल टी पॉइंट 51
सूतगिरणी चौक 127
सेव्हन हिल्स 62
कामगार चौक 72